सदरच्या गुन्ह्यात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे व्यक्तींची नावे आली आहेत. शिक्षकांची फसवणूक करणार्यांना गुरूजींच्या राजकारणातील राज्य पातळीवरील नेत्याची फूस असल्याची चर्चा आता जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यासह राज्यातील शिक्षकांना वेगवेगळ्या आर्थिक स्कीमची लालूच दाखविणारी शिक्षक नेत्यांची सोनेरी टोळीच कार्यरत असल्याची कुजबुज शिक्षकांमध्ये सुरू झाली आहे.
हजारो लाखो रुपये देऊन राज्याचे नेते जिल्ह्यात पदांची खिरापत वाटत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांमधून होत आहे. तर दुसरीकडे पद दिलेल्यांमार्फत सर्वसामान्य शिक्षकांना पैसे दामदुप्पटचे आमिष दाखवत पैसे लाटण्याचा धंदाच सुरू आहे, असे समजले आहे.
तसेच जिल्ह्यात कार्यरत असणार्या एका सोनेरी टोळीने शिक्षक बँकेत नोकर भरती व विविध सामान किंवा इतर खरेदीच्या माध्यमातून पैसे उकळायचे होते. पण त्यास सत्ताधारी गटाच्या एका नेत्याने विरोध केल्यामुळे या टोळीचा तिळपापड झाला.
त्यामुळे या नेत्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घेऊन तिथे दुसर्या संघटनेच्या जिल्हाध्यक्षची वर्णी लावण्यात आली. दरम्यान आता फसवणुकीच्या गुन्ह्यात शिक्षक नेत्यांचे नाव आल्याने जिल्ह्यातील शिक्षकांची असणारी प्रतिमा डागाळली असून या गोष्टीला राज्यातील नेते कारणीभूत असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत.
आता या फसवणुकीची व्याप्ती शोधण्यासाठी गेल्या दोन वर्षांत शिक्षक बँकेच्या नगर व पारनेर शाखेतून घेतलेल्या एकरकमी कर्जाची माहिती मागविण्यात येणार आहे. त्या नंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे किती शिक्षकांची फसवणूक झाली हे समोर येईल.