तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी होत नसल्याने, परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना स्मरणपत्र दिले. यावेळी विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद बबन शिंदे, जालिंदर शेळके उपस्थित होते.
सन 2016 पासून संस्थेच्या सर्व शाखांचे ऑनलाइन प्रणालीच्या कामकाज अद्यापि अपूर्ण असून, दोन महिन्यापूर्वी पारनेर शाखेतील डाटा सेंटरच्या नावाखाली देण्यात आलेल्या ऑनलाइनच्या कामामुळे पूर्वी झालेले काम अपूर्णच असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उपोषणाचा इशारा
माध्यमिक शिक्षक सोसायटीत सत्ताधारी संचालक मंडळाने केलेल्या ऑनलाईन प्रणालीच्या कामांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी. संस्थेला व सभासदांना न्याय द्यावा. अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासद आपल्या कार्यालयासमोर ठिय्या देऊन उपोषण करतील, असा इशारा संचालक बाबासाहेब बाेडखे यांनी दिला.