गेल्या वर्षभरापासून होणार होणार म्हणत अटीतटीच्या अन् चुरशीच्या निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघात माजी आ. नीलेश लंके आणि शिर्डी मतदारसंघात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेच बाजीगर ठरले. लंके यांनी सुमारे २८ हजार ९२९ मतांनी विजयी मिळविला तर वाकचौरे यांनी ५० हजार ५०० मतांनी विजय मिळविला.
शिर्डीत वाकचौरे यांना ४ लाख ७६ हजार ९०० तर लोखंडे यांना ४ लाख २६ हजार ३०० मते मिळाली. अहमदनगरमध्ये लंके यांना ६ लाख २४ हजार ७९७ मते मिळाली तर डॉ. सुजय विखे पाटील यांना ५ लाख ९५ हजार ८६८ मते मिळाली.
एमआयडीसीतील शासकीय गोदामाच्या आवारात मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणी सुरु झाल्यापासून साधारणतः ७ फेऱ्यांपर्यंत डॉ. सुजय विखे पाटील यांनी अगोदर आघाडी घेतली होती. मात्र, ही आघाडी कमी कमी होत जाऊन ८ फेरीअखेर लंके आघाडीवर आले.
त्यानंतर ही आघाडी भरुन काढण्यात विखेंना यश आलेच नाही. शिर्डीत मात्र पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतलेल्या माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी अखेरपर्यंत ही आघाडी टिकवून ठेवत सदाशिव लोखंडे यांना कात्रजचा घाट दाखविला.
निकालाविषयी निवडणूक सकाळपासून व्हॉटस् अॅप वर सुरु असेलल्या मेसेजमुळे सामान्य नागरीकांचा गोंधळ उडत होता. त्यात शिडीची मतमोजणी वेगाने सुरु होती आणि नगरची यंत्रणा ढिल्ली वाटत होती. मोठ्या विलंबाने नगरची मतमोजणी सुरु होती, अशी सामन्यांची भावना होती.
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात ६ व्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व हा विकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात काट्याची टक्कर पहायला मिळाली. प्रशासनाकडून उशिराने अधिकृत आकडेवारी जाहीर केले जात असल्यामुळे नेमकी आघाडी कळत नसले तरी कार्यकर्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अकराव्या फेरीअखेर निलेश लंके यांनी दहा हजार पेक्षा अधिक मताची आघाडी घेतल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे निलेश लंके विजय होतील, असा अंदाज बांधून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.