गरजू मुलींना दिल्या जाणार्या सायकलींच्या किमती गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत असल्याने व चांगल्या दर्जाची सायकल घेण्यासाठी शासनाकडून देण्यात येणारे 3500 रूपये अनुदान अपुरे पडत असल्याने हे अनुदान वाढविण्यात यावे अशी मागणी विद्यार्थीनी आणि पालकांकडून होत होती त्याची दखल घेत सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेतला आहे.
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 8वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणार्या गरजू मुलींना सायकलींचे अनुदानावर वाटप करण्यात येते. या लाभार्थी विद्यार्थींनींना 5000 रूपये अनुदान अटी व शर्तीच्या अधीन राहून शासन मान्यता देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात डीबीटी द्वारे 3500 रूपये आगाऊ रक्कम जमा करण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानतर सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर उर्वरित 1500 रूपये अनुदान थेट अदा केले जाणार आहे.
गरजू मुलींना इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहिल व त्यांना 4 वर्षांत सायकल खरेदीसाठी अनुदान एकदाच अनुदान मिळणार आहे.
नगर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थिनींना होणार लाभ
या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील शासकीय शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, शासकीय अनुदानित शाळा तसेच ज्या अनुदानित व शासकीय आश्रमशाळेतील मुलींना डे स्कॉलर प्रवेश दिला जातो व ज्यांना दररोज घरापासून ये-जा करावी लागते, अशा हजारो शालेय विद्यार्थिनींना होणार आहे.