माझा बाप.... माझं विद्यापीठ.... माझं आभाळ....शांत झालय....😢....
.... अतिशय सामान्य म्हणण्यापेक्षा ज्या कुटुंबाच्या अगदी जन्मताच उंबरठ्यावर दारिद्र्य पूजल होत अशा कुटुंबात जन्माला आलेल्या माझ्या बापाच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष आला...
बरोबरची मुलं शाळेत जाताहेत म्हणून माझ्या बापानं त्या काळात त्यांच्या बापाजवळ शाळेचा हट्ट धरला तर " शिकून कोणता मोठा साह्येब होणार हैस त्या पेक्षा जनावर वळ चार पैशे कमावशील " अस म्हणून त्यांच्या बापानं त्यांचं शिक्षण नाकारलं.... त्यावेळी त्यांच्या आईन म्हणजे गंगाई ने नवऱ्याचा विरोध पत्करून वयाच्या 12 व्या वर्षी माझ्या बापाला शाळेत पाठवलं...
आणि बाप रोज बापाचा मार खाता खाता आणि शिव्या ऐकता ऐकता शाळा शिकत होता....
कधी अंगाला नीट कपडा नव्हता की पोटाला पोटभर भाकर...
शिळ्या भाकरीचे तुकडे चुलीवर भाजून एखाद्या मळक्या कपड्यात बांधून बाप १२ आणि १२ असे २४ किलो मीटर रोज शाळेत यायचा जायचा... तीही भाकर कधी असायची कधी नसायची... कधी कधी तर इळन माळ पोटाला भाकरी मिळत नसायची... पण बापानं कधीच तक्रार केली नाही.
बापाचा बाप कुणाच्याही घरावर मिळल ते काम करायचा आणि कामाच्या बदल्यात मिळल तितकं धान्य आणि मिळल तितकी भाकर घरी घेऊन यायचा आणि घरच्या नऊ दहा माणसांच पोट भरायचा..
तसा माझा अज्जा स्वाभिमानी होता कधी कुणाकडून फुकट ची अपेक्षा केली नाही की कधी पोटासाठी कुणापुढं झुकला नाही
पण घरात तोच एकटा कमावता माणूस आणि त्यात लेकाने म्हणजे माझ्या बापाने जनावर वळायचे सोडून शाळा सुरू केली होती त्यामुळं महिन्याला त्या राखुळीतून येणारे रुपये २ आता बंद झाले होते. त्यामुळं बापाच्या बापाची चिडचिड वाढत जाऊ लागली होती....
खर तर परिस्थितीपुढं तोही लाचार झाला होता....
बाप शाळेत तर जात होता पण कधी पेन नसायचा तर कधी पेन्सिल नसायची... जिथून जिथून कोरा कागद मिळेल तिथून तिथून तो गोळा करायचा आणि त्याची वही शिवायचा... पुस्तक तर आयुष्यात बापाला कधी विकतच घेता आला नाही. कधी कुणाची लाख विनंती केल्या नंतर कधी कुणी पुस्तक दिलंच तर बाप आधाशा सारखा घासलेट च्या दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात रात्रीतून आख्ख् पुस्तक वाचून काढायचा...
उन्हात कधी बापाला चप्पल मिळाली नाही ... नाही पावसाळ्यात कधी छत्री... ना हिवाळ्यात स्वेटर... एकच शर्ट आणि एकच पॅन्ट सतरा ठिकाणी शिवून आणि संधी मिळेल तसा धुवून पुन्हा तोच घालायचा....
आयुष्यात प्रचंड फरपट आली बापाच्या वाट्याला पण बाप कधी थकला नाही की खचला नाही.
हिमालयासारखा प्रत्येक संकटासमोर उभा रहात गेला... बाप शिकत असताना बापानं पुन्हा एकदा बापाचा विरोध पत्करून आपल्या भावाला आणि बहिणीला शिकवलं.....
कस बस बापाच शिक्षण पूर्ण झालं आणि बापाला पहिल्यांदा इंटरव्ह्यू कॉल आला तेंव्हा माझ्या आजीनं 15 रु ला घरातल भगूणं गहाण टाकलं आणि लेकाला म्हणजे माझ्या बापाला सोलापूर ला इंटरव्ह्यू ला पाठवलं आणि बाप ७५ रु महिन्याने सरकारी नोकरीला लागला..... आणि घराची अवकळा गेली....
मला आठवतंय अजूनही स्पस्ट तेंव्हा मी साधारण सात आठ वर्षांचा असेल... म्हणजे साधारण 32 33 वर्षा पूर्वीची गोष्ट असेल तेंव्हा माझा बाप म्हणजे आमचे आप्पा... त्यांच्या ऑफिस ची हुरडा पार्टी होती तेंव्हा त्यांच्या ऑफिस चे वरिष्ठ आणि कनिष्ठ असे सगळेच अधिकारी आणि कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत उपस्थित असणार होते...
म्हणून गावाकडून आलेला माझा आजा ऑफिस च्या गेट समोर उभा राहिला तेंव्हा वाचमन ने हाकलल माझ्या आज्या ला आणि माझा आजा तिथून खाली मान घालून काहीच न बोलता निघाला तितक्यात कुणी तरी गेट वर धावत गेलं आणि "अरे ते शेलार साहेबांचे वडील आहेत " अस सांगितलं आणि वाचमनने त्यांची माफी मागून त्यांना सन्मानाने आत घेतलं..... आणि माझ्या बापाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पंगतीत आदराने टेबल आणि खुर्ची वर बसऊन त्यांना जेवण दिलं...
माझ्या आज्याला हा आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी दिलेला मान आणि सन्मान होता... लग्नाच्या पंगतीत पण कोपर्याला अंग चोरून माती वर जेवायला बसणारा माझा आजा आज पहिल्यांदा टेबल आणि खुर्ची वर जेवायला बसला होता.
आज्यान पोटभर जेवण केलं आणि घरी जाऊन हमसून हमसून रडला....
आणि म्हणाला " माझं पोर आज खरंच साह्येब झालं "
माझ्या बापानं ... बापाच नाव मोठं केलं....
नोकरीच्या निमित्ताने बापानं गाव कधीच सोडलं पण गावाशी नातं मात्र तुटू दिलं नाही... आणि तिथल्या माणसांशीही....बापानं गरिबीची झळ सोसली होती म्हणून बाप आयुष्यभर जमिनीवर राहिला....
नोकरीच्या निमित्ताने अनेक प्रसंग आले पण बापानं कधीच कोणत्या गरीब शेतकऱ्याला लुटल नाही की कधी कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ दिलं नाही. बापानं आयुष्यात फार पैसा नाही कमावला पण माणसं कमावली आणि नाती जपली...
पैशांसाठी बापानं नाती कधीच तुटू दिली नाही.. मग ती रक्ताची असोत की मैत्रीची....
कुठल्या मातीचा बनवला होता हा जीव देवाण कोण जाणे...
आयुष्यात सहा वेळा मृत्यूशी झुंझ देऊन परतलेला माझा बाप या वेळी थकलेल्या शरीरामुळं मात्र हरला....
जाण्यापूर्वी शेवटच्या दिवशी बापाचा आवाज खचला होता आणि नेमकं त्याच वेळी त्यांना माझा हात हातात घेऊन नेमकं काय सांगायचं होत काय माहिती....
बाप काळाच्या पडद्याआड गेलाय पुन्हा कधीच न येण्यासाठी....
पण त्यांच्या आठवणी मात्र अजूनही जिवंत आहेत...
रात्रीचे साडेतीन वाजून गेलेत डोळ्यांवर अजूनही झोप येत नाहीये आज मुद्दामच बाप झोपायचा त्या बाजेवर मी झोपलोय.... आणि आज इथे बापाची ऊब जाणवते आहे...
ते अजूनही इथेच कुठेतरी आहेत....
आप्पा खूप आठवण येतेय आज....
😢