WhatsApp वर अश्लिल व्हिडिओ पाठवून केला महिलेचा विनयभंग

WhatsApp वरून अहमदनगर येथील महिलेला अश्लिल व्हिडिओ, मेसेज करणार्‍या तरूणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. दिपू लक्ष्मणदास आहुजा (रा. उल्हासनगर, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कसा केला तपास ?

नगर जिल्ह्यातील एका महिलेस तिच्या व्हॉट्सअ‍ॅपवर अज्ञात व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरून अश्लिल व्हिडिओ, मेसेज करून मानसिक त्रास दिला होता. त्या महिलेने सायबर पोलीस ठाणे गाठून 20 जानेवारी 2022 रोजी फिर्याद दिली होती. सायबर पोलिसांनी भादंवि 354 (अ), 354 (ड), 500 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, वासुदेव शेलार यांनी गुन्ह्याचे तांत्रिक दृष्ट्या तपासणी करून  आरोपीची खात्री केली. पोलीस पथकाने पथकाने मुंबई येथे जावून आरोपी आहुजा याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सोशल मिडीयावरून घेतला होता नंबर
आपण सर्वजण सोशल मीडियावरील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया साइटवर अकाऊंट तयार करतो. त्यावर आपली माहिती भरताना मोबाईल क्रमांक टाकतो. नागरिकांनी अ‍ॅपवर भरलेली माहिती चा  गैरवापर होण्याची शक्यता असते. 

या गुन्ह्यातील आरोपी दिपू आहुजा याने देखील महिलेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सोशल मीडियावरून प्राप्त केला होता. त्या नंबरवर अश्लिल फोटो, मेसेज करून महिलेचा विनयभंग करत त्यांना मानसिक त्रास दिला होता.

 नागरिकांनी सोशल मीडियावरील अ‍ॅपवर भरलेली माहिती प्रायव्हसी लॉक करून ठेवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.