आत्मदहनाचा इशारा देताच कोपरगाव बाजार समितीच्या चौकशीचे आदेश
कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव बाजार समितीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सुधाकर जाधव यांनी १ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार पणन संचालनालयाचे संचालक विकास रसाळ यांनी १९ मार्च रोजी बाजार समितीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याचे आदेश अहिल्यानगर सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहेत.
काँग्रेसच्या किसान सेलचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव यांनी कोपरगाव बाजार समितीत बोगस व भ्रष्ट कारभार होत आहे. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक यांनी प्रशासकीय काळापासून ते संचालक मंडळ कालावधीमधील सर्व गैरव्यवहारांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी केली होती. चौकशी न झाल्यास दि.१ मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्या अनुषंगाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे संचालक विकास रसाळ यांनी दि. १९ मार्च रोजी आदेश काढून जिल्हा उपनिबंधकांना नियंत्रक अधिकारी या नात्याने चौकशी करून महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, असे सूचविले आहे.