सौ. सुशीलामाईंच्या विचारांचा दूरदर्शीपणा आजही प्रेरणादायी -सौ.पुष्पाताई काळे
स्व.सौ.सुशीलामाई काळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी :- पूर्वी महिलांना समाज प्रत्येक बाबतीत अलिप्त ठेवत असे. आज अशी परिस्थिती नाही. पूर्वीची स्त्री ही खऱ्या अर्थाने अष्टावधानी आणि दूरदर्शी विचारांची होती. याचा प्रत्यय स्व.सौ.सुशीलामाईंच्या व्यक्तिमत्त्वातून येतो.जे आपल्या मागे आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांच्या आनंदात आनंद मानणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच दुसऱ्यांच्या प्रगतीत आणि दुसऱ्याच्या सुखातच आनंद मानला. तीन दशकापूर्वी ग्रामीण भागात अशी परिस्थिती होती की,आठवीनंतर मुलींची संख्या कमी होत असे. त्यावेळी सौ.सुशीलामाई काळे यांनी कर्मवीर शंकररावजी काळे यांना मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा आग्रह धरल्यामुळे राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर उभे राहिले. त्याचा फायदा घेवून मोठ्या प्रमाणात मुली उच्च शिक्षण घेऊन प्रगती करीत आहेत. सौ.सुशीलामाईंच्या विचारांचा हा दूरदर्शीपणा आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि त्याचा मला अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे कन्या विद्यालयात, स्व. सौ. सुशीलाताई ऊर्फ माईसाहेब काळे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ भव्य वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की,वक्त्याने नेहमी विषय समजून घेऊनच बोलले पाहिजे.विद्यार्थ्यांच्या जीवनात, स्पर्धा असल्याशिवाय प्रगती होत नाही. त्यामुळे सर्वांनी स्पर्धेचे नेहमीच स्वागत करून स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे आणि सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा दिले पाहिजे. स्पर्धेत सहभागी होतांना स्पर्धा ही नेहमी निकोप राहील यासाठी प्रयत्न करून स्पर्धा संपली की, ज्ञान आणि प्रेमातून मैत्री वृद्धिंगत करून एकमेकांप्रती आदर वाढवा असा मौलिक सल्ला सौ.पुष्पाताई काळे यांनी उपस्थित स्पर्धकांना दिला. यावेळी अरूण चंद्रे म्हणाले की, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात राज्याचे नेतृत्व करणाऱ्या कर्मवीर स्व. शंकररावजी काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या केलेल्या भव्यदिव्य विस्तारात स्व.सुशीलामाई काळे यांचे मोठे योगदान होते.त्या कर्मवीर स्व.शंकरराव काळे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या म्हणूनच ते एवढे मोठे समाजकार्य करू शकले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाचनाला महत्त्व दिले पाहिजे, वाचनाने आपल्या ज्ञानाच्या, विचारांच्या कक्षा रुंदावत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संभाजीराव काळे,.अरूण चंद्रे, कचरू कोळपे, भाऊसाहेब लूटे, बाळासाहेब ढोमसे, डॉ.आय.के.सय्यद, माजी प्राचार्य शेख, सतीश नरोडे, पराग काळे, रयत संकुलाचे प्रमुख प्राचार्य प्रकाश चौरे,प्राचार्या सौ. हेमलता गुंजाळ, मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, उपप्राचार्य मधुकर गोडे, प्र.पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी विद्यालयासाठी अकरा हजार रुपये देणगी दिली. प्रास्ताविक नितीन बारगळ यांनी केले. सूत्रसंचालन श्रीम.स्मिता पाटील यांनी केले तर सिद्धार्थ कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते