मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी घेतले श्री महेश्वराचे दर्शन
आ. आशुतोष काळेंनी कावड यात्रेत सहभागी होत भाविकांचा वाढविला उत्साह
कोपरगाव प्रतिनिधी –सालाबादप्रमाणे याहीवर्षी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील सर्वात मोठ्या तसेच कोळपेवाडीसह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी माजी आमदार अशोकराव काळे, आ.आशुतोष काळे यांनी यात्रोत्सवास भेट देवून श्री महेश्वर महाराजांचे मनोभावे दर्शन घेत श्री महेश्वर महाराजांची कृपा दृष्टी सर्वावर रहावी अशी प्रार्थना श्री महेश्वर चरणी केली. याप्रसंगी काढण्यात आलेल्या कावड यात्रेत आ.आशुतोष काळे यांनी खांद्यावर कावड घेवून कावड यात्रेत सहभागी होत भाविकांचा उत्साह वाढविला.
कोळपेवाडी येथील श्री महेश्वर महाराज हे एक जागृत देवस्थान असून दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोळपेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महेश्वर महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठी यात्रा असा या यात्रेचा नावलौकिक असून वर्षभर येथे भाविकांची मांदियाळी असते. आ.आशुतोष काळे यांनी श्री महेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देत निधी मिळवून दिल्यामुळे मंदिर परिसर सुशोभिकरण करणे आदी कामासाठी मोठ्या प्रमाणात मदत झाली असून त्यामुळे भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळत आहेत.
सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोळपेवाडी ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेकरूंसाठी विविध धार्मिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेत असतांना कुठलेही चुकीचे वर्तन घडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी यात्रा कमिटीच्या वतीने चोख व्यवस्था केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त करून यात्रा उत्सव शांततेत साजरा करावा अशा सूचना देवून सर्वाना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.