वाईन विक्रीचा निर्णय अद्याप अंतिम झालेला नाही. लोकांकडून या निर्णयावर हरकती मागवण्यात येणार असून त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करताना सांगितले. यावेळी त्यांनी हजारे यांना उपोषण टाळण्याची विनंती केली.
नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील या चर्चेवेळी उपस्थित होते. यावेळी वाईन विक्रीला हजारे यांचा असणार तीव्र विरोध, सोमवारपासून दिलेला उपोषण करण्याचा इशारा यावर चर्चा झाली आहे. किराणा दुकानात वाईन विक्री करण्यापूवी त्यावर जनतेकडून हरकती, त्यांचे अभिप्राय मागवण्यात येणार आहेत. ग्रामसभेच्या परवागनीनंतरच हा निर्णय अंतिम करण्यात येणार आहे.
वाईन विक्रीचा निर्णय वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळून पाहिल्यावर अंतिम होणार असल्याने हजारे यांनी उपोषणाची घाई करू नयेत, अशी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न अधिकार्यांकडून करण्यात आला. नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, पुणे विभागाचे राज्य उत्पादन शुल्क विभागीय अधिकारी प्रसाद सुर्वे, जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, शाम पठाडे, पारनेर पोलीस निरिक्षक बळप आदी उपस्थित होते.