राज्य सरकारच्या सुपरमार्केट व किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विरोध केला असून सोमवारी ( 14 फेब्रुवारी) पासून त्या विरोधात उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सरकार सोबतच प्रशासन देखील अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये, म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी लागले आहे.
उपोषणावर ठाम
त्या धर्तीवर नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी अण्णा हजारे यांची काल दुपारी एक वाजेच्या सुमारास भेट घेऊन उपोषण करू नये, अशी विनंती केली. शेखर पाटील व अण्णा हजारे या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र हजारे यांनी मी आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.
या भेटीच्या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, उत्पादन शुल्क पुणे विभागाचे प्रसाद सुर्वे, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप, सरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दत्ता आवारी, श्याम पठाडे, हेड कॉन्स्टेबल भालचंद्र दिवटे आदी उपस्थित होते.
बंद दाराआड चर्चा
राज्य सरकारने वाईनची विक्री सुपर मार्केट तसेच किराणा दुकानातून करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात हजारे सोमवारपासून उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर शेखर व हजारे यांच्यात यादवबाबा मंदिरात हजारे यांच्या खोलीत बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी शेखर यांनी हजारे यांना उपोषण करू नये, अशी विनंती केली. तसेच वाढत्या आपल्या वयाचा विचार करता उपोषण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चा करून सोडवावा, अशी विनंती केली. मात्र चर्चेनंतर हजारे यांनी मी माझ्या मागणीवर ठाम आहे.
राज्य सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. त्यांनी तो मागे घ्यावा. मी माझ्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हजारे यांचे उपोषण जवळजवळ निश्चितच झाल्याचे दिसून येत आहे.