जुने कागदपत्रे महत्वाचे होते, त्यातच अज्ञात अशा कारणाने आग लागली याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
कोळपेवाडी ग्रामपंचायतच्या जुन्या कार्यालयाच्या पुढील खोली मध्ये नमुना एक ते अठ्ठावीस चे महत्त्वाचे कागद पत्रे, पावती पुस्तके, ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास याच खोलीला अचानक आग लागल्याचे नागरीकांच्या लक्षात आले.
खोलीतून मोठ्या प्रमाणात धुर व ज्वाला निघत असल्याचे राहुल कोळपे यांना दिसुन आले. त्यांनी तात्काळ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला फोन करून आग लागल्याची माहिती दिली तो पर्यंत बरेच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल होवुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र ज्वालानी रुद्ररुप धारण केल्याने ग्रामस्थ हतबल झाले होते.
काही वेळात अग्निशमन दल दाखल होवुन पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ग्रामस्तांच्या जागेसह घरांच्या संबधीत महत्वाचे कागदपत्रे जळाले आहेत.
सकाळी ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जळालेल्या रेकॉर्ड रुम ची पाहणी करुन कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
दरम्यान याबाबत पंचायत समिती कोपरगाव चे गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी म्हणाले की, जुने कागदपत्रे ठेवलेल्या खोलीला आग कशामुळे लागली याचे कारण निश्चित समजले नाही.
मात्र सन १९७२ पासुन ते २००४ पर्यंतचे महत्वाचे अनेक कागदपञ या आगीत जळाले आहेत. या घटनेबद्दल ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांच्या तक्रारीवरून पोलीसात तक्रार देण्यात आली असल्याचे सांगितले.