सुरत ते चेन्नई या प्रकल्पांतर्गत या ग्रीन फिल्ड महामार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ६९ गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी ९८० हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत सुरत ते चेन्नई प्रवासासाठी तीन महामार्गांचा उपयोग केला जातो. त्यातील सुरत ते चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर या महामार्गामुळे एक हजार २५० किलोमीटरवर येणार आहे. परिणामी नाशिकहून चेन्नईपर्यंतही आठ तासांमध्ये पोहोचता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ६९ गावांमधून जाणाऱ्या या महामार्गावर सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून, या एकूण प्रकल्पाची किंमत ५४ हजार कोटी आहे. या महामार्गामुळे लॉजिस्टिक पार्क, रिसर्च सेंटर, इंडस्ट्रियल क्लस्टर, अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रिज, कूलिंग प्लांटना चालना मिळणार आहे. सुरगाणा-पेठ या भागांमधून हा महामार्ग जात असल्याने आदिवासीपट्टाही विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे. दिंडोरी-सिन्नरमधून सर्वाधिक मार्ग
जिल्ह्यातील ६९ गावांमधून जाणाऱ्या हा महामार्ग सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यातील बहुतांश अंतर व्यापणार आहे. दिंडोरी तालुक्यातून ४२.६४ किलोमीटरच्या अंतरात २३ गावांमधून, तर सिन्नर तालुक्यात ३१.६१ किलोमीटरच्या अंतरात १६ गावांमधून हे मार्गक्रमण होणार आहे. याशिवाय सुरगाणा तालुक्यातून १७.०२ किलोमीटर अंतरातून १२ गावे, पेठमध्ये ५.९२ किलोमीटर अंतरात ५ गावे, नाशिकमध्ये ११.९५ किलोमीटरमध्ये ४ गावे, निफाडमधून १२.९० किलोमीटरमध्ये ९ गावे यात समाविष्ट राहतील.