Kidnap Of Goverment Official टेम्पोसह कोतवालाचे अपहरण करून वाळूतस्कर झाले पसार

राहुरी येथील महसूल विभागातील नायब तहसीलदार पुनम दंडिले या शनिवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण भागात मुळा नदी पात्रात वाळू चोरून वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत होत्या. त्यावेळी दोन आरोपींनी तेथील साक्षीदाराचे अपहरण करून वाळूचा टेम्पो चालू करून पळवून नेला. याबाबत दोघां जणांवर अपहरण  सह सरकारी कामात अडथळा हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


सविस्तर वृत्त असे की,  नायब तहसीलदार पुनम दंडिले या शनिवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण भागात  दौऱ्यावर होत्या.
आरोपी मुळा नदीपात्रात टेम्पोमधून वाळू चोरून वाहतूक करत असताना त्यांना आढळून आले. त्यावेळी तहसीलदार पुनम दंडिले यांनी त्यांच्या सोबतच्या एका कर्मचाऱ्याला टेम्पोमध्ये बसवून सदर वाळूचा टेम्पो तात्काळ  राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यास सांगितले. 
मात्र त्या आरोपींनी टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारात न आणता टेम्पोचा स्पीड वाढवून वाळूचा टेम्पो आणि सोबत बसलेला महसूल विभागाचा कर्मचारी याला घेऊन वळण पिंप्री, खेडले परमानंद सोनईच्या दिशेने वेगात पसार झाले.

पुढे जाऊन त्यांनी  महसुल कर्मचाऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि  त्याला टेम्पो मधून शिवीगाळ दमदाटी करून खाली उतरून दिले 
यावेळी सदर घटनेत ५ लाख रूपये किंमतीचा टेम्पो सह २० हजार रूपये किंमतीची 2 ब्रास वाळू असा एकूण ५ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन आरोपी अमोल बर्डे व त्याच्या बरोबर आणखी एक अनोळखी तरूण पसार झाले आहेत.

त्या दोघांवर अपहरण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच दमदाटी करण्याचा गुन्हा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.