महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु, या पुरोगामी महाराष्ट्रात काही लाजिरवाणाऱ्या घटना घडत आहेत. लातूरच्या ताडमुगळी गावातील संपूर्ण मागासवर्गीय समाजावर बहिष्कार घालण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावातही अशीच एक घटना समोर आली आहे. या गावात दलित समाजावर बहिष्कार घालण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सावरखेडा गावामध्ये गायरान जमिनीवर निळा झेंडा लावल्याच्या कारणावरून दलीत समाजावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला आहे. गावातील महिला सरपंचाचे दीर भागवत मुंडे यांनी एक जानेवारी रोजी बैठक घेऊन संपूर्ण सवर्ण समाजाच्या वतीने दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून आजपर्यंत दलित समाजातील नागरिकांना पिठाच्या गिरणीवर दळून दिले जात नाही. शिवाय किराणा दुकानदार बाजार देत नाहीत.
धक्कादायक बाब म्हणजे दलित समाजातील नागरिकांना रिक्षातसुद्धा बसू दिलं जात नाही. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या महिलेला रूग्णालयात न्यायचे असेल तरीही दलित समाजातील महिला किंवा पुरुषांना ऑटोमध्ये बसू दिले जात नाही.
दरम्यान, याप्रकरणी आज दलित बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली