कोपरगाव गोदावरी नदी पुलावरून कॉलेज तरुणीची नदीत उडी !

येथील नगर-मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावरून एका कॉलेज युवतीने उडी मारली. ही खळबळजनक घटना आज, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिस प्रशासन व पालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी व मच्छीमार या तरुणीचा मागील दोन तासांपासून शोध घेत आहेत.
 
😳 मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर आपली बॅग बाजूला ठेऊन एका तरुणीने नदीत उडी घेतली आहे. या मुलीने उडी घेत असताना या महामार्गावरून त्यावेळी दुचाकीवरून जात असलेला सर्पमित्र संदीप खिरे या तरुणाने बघितले, व तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले. कोपरगाव शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मुलीचा शोध सुरूच
नदीपात्रात पोलिस कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी खिरे यांनी या तरुणीचा शोध घेतला. मात्र दुपारी चार वाजेपर्यंत शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर स्थानिक पोहणाऱ्या व मच्छिमार करणाऱ्या नागरिकांच्या साहाय्याने पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे मदन निंदाने, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे,घनधाम कुर्हे आदींसह पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी मुलीचा शोध घेत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या तरुणीने नदीत उडी मारण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.