तीन दिवसांपूर्वी गोदावरी डावा कालवा फुटला असून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.शेतीला वेळेवर रोटेशन नाही,कालव्याच्या दुरुस्तीसाठी कोटींच्या गप्पा झाल्या पण प्रत्यक्षात या सर्व हवेतल्या बाता कालवा फुटल्याने उघड पडल्या आहेत.आमदार काळे यांनी दोन वर्षे जनतेची दिशाभूल केल्याने त्यांना जे राहतात एका पक्षात पण त्यांचे सूत जुळलेले असते तिसर्या पक्षात. अशा सोमनाथ चांदगुडे यांचा खांदा कोल्हेंवर टीका करायला वापरावा लागतो आहे हे काळे यांचे अपयश आहे अशी टीका कोल्हे कारखान्याचे संचालक मनेश गाडे यांनी केली आहे.
कालवा दुरुस्तीसाठी 55 कोटी मिळवले अशी प्रसिद्धी लाटणार्या काळे यांनी दोन दिवसांपूर्वी कालवा फुटला व हे 55 कोटी त्यातच मुरले की काय ? या वस्तूस्थिती पासून तोंड लपवण्यासाठीच आमदार काळे हे कोल्हेंवर टीका करण्यासाठी सोमनाथ चांदगुडे यांच्या सारख्या कायमच एका पक्षात राहून दुसर्या पक्षाला मदत करणार्या नावाचा आधार घेत आहेत.चांदगुडे हे पदासाठी कायमच काळेंच्या इशार्यावर चालत असल्याने त्यांचे भाजपमधून स्थान संपुष्टात आले.
सोमनाथ चांदगुडे यांनी पद्मकांत कुदळे यांच्या समवेत कालवा सल्लागार समितीच्या ढिसाळ धोरणाविरोधात भूमिका घेऊन काळे यांना घरचा आहेर देऊन अद्याप काही महिने देखील झाले नाहीत तोच त्यांना जणू काही सारे काही आलबेल असल्याचा साक्षात्कार झाला असा यु टर्न घेतला आहे. काळेंच्या विरोधात एक काळ गरळ ओकणार्या चांदगुडे यांचे जुने दाखले दिले तर बरच काही चर्चेत येईल.सध्याच्या परिस्थितीत काही ना काही पद पदरात पाडून घेण्यासाठी चांदगुडे हे काळेंच्या तालावर पुन्हा थिरकू लागले आहेत अशा राजकीय अस्थिर नावाने कोल्हेंवर टीका करणे हेच मुळात हास्यास्पद आहे.
2005 ला काळेंच्या कार्यकाळात कायदा संमत होतांना असलेल्या नियम अटी यात फार बदल होते याचा अभ्यास करावा व माजी आमदार काळे हे आमदार असतांना या कायद्याला संमत होतांना त्यांनी साधलेली सोयीस्कर चुप्पी हा प्रवासही सर्वांना माहीत आहे. 2004 साली जेव्हा शिवसेनेने माजी आमदार अशोकराव काळे यांना संधी देऊन आमदारकी त्यांना मिळाली, त्याच वेळी त्यांनी शेतकरी व जनतेच्या हिताच्या आड येईल असा कायदा होऊ नये या साठी विरोध करायला हवा होता. मात्र त्यांना राष्ट्रवादीला विरोध करायचाच नव्हता हे स्पष्ट होते कारण भविष्यात त्यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा होता यासाठी त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्याला मूक संमती दर्शवली.
आमदार आशुतोष काळे यांनी आगामी अधिवेशनात हा कायदा रद्द करण्याची प्रक्रिया करून घ्यावी कारण सरकार त्यांचे आहे. ते आता श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आहेत त्याचा वापर करून समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून घ्यावा. मागे काय झाले हा इतिहास आपल्या सोयीने रंगवण्यात त्यांना आवड आहे मात्र वर्तमान काळात यावर कृती करण्याची त्यांची तयारी नाही. माजी मंत्री शंकररावजी कोल्हे यांचा कोपरगाव विकासात मोलाचा वाटा आहे. माजी मंत्री कोल्हे यांनी तालुक्याच्या पाणीप्रश्नासाठी केलेले आंदोलने, प्रयत्न, दिलेला लढा हा स्वतः स्वर्गीय काळे साहेब यांनीही कधी नाकारला नव्हता.
कोल्हे कुटूंबाचे भरीव काम तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठीच राहिले आहे. यासाठी खडा आंदोलन, रुम्हणे मोर्चा, वीज मीटर आंदोलन, पाट पाण्यासाठी लढा, पाणी प्रश्नावर स्व पक्षाशी संघर्ष असे कित्येक उदाहरणे देता येतील. आमदार काळे हे दोन वर्षांपासून सर्व प्रश्नांवर जनतेची दिशाभूल करत आहेर त्यामुळेच त्यांना कोल्हे कुटूंबावर टीका करण्यासाठी सोमनाथ चांदगुडे यांच्यासारख्याचा इतरांचा खांदा वापरावा लागत आहे असे खडेबोल गाडे यांनी सुनावले आहे.