सौरपंपाच्या नावाखाली कोपरगावच्या शेतकऱ्यांना गंडवले


बनावट वेबसाईट तयार करून सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देण्याच्या नावाखाली लुट करणार्‍या आरोपीने आतापर्यंत 14 शेतकर्‍यांना लाखो रूपयांना गंडा घातल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांमध्ये कोपरगाव, शेवगावसह औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा समावेश आहे. सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी किशोर विठ्ठल काळे (रा. आपेगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला अटक केली होती. त्यानंतर फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी या सर्व शेतकर्‍यांचे जबाब नोंदविले आहेत.
दरम्यान आरोपी काळे याने शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन करण्यासाठी काही शेतकर्‍यांना गुजरात येथून कमी किंमतीमध्ये खरेदी केलेले सौरपंप दिले होते. त्यातील तीन सौरपंप सायबर पोलिसांनी जप्त केले आहेत. या फसवणूकीची व्याप्ती मोठी असून सायबर पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देतो, अशी बतावणी करून माझी फसवणूक केली असल्याची फिर्याद राक्षी (ता. शेवगाव) येथील एका शेतकर्‍याने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून आरोपी किशोर काळे याला अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने अनेकांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.

अशी करायचा फसवणूक
किशोर काळे याने एक वेबसाईट तयार केली होती. त्या वेबसाईटची जाहीरात करून त्याने जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला होता. शेतकर्‍यांकडून तो 16 हजार 500 रूपये भरून घेत असे व तीन महिन्यात सौरपंप मिळेल, असे आश्‍वसन देत होता. शेतकर्‍यांचा विश्‍वास बसावा यासाठी काळे याने कमी किंमतीमध्ये गुजरात राज्यातून काही सौरपंप खरेदी केले होते. ते त्याने ठराविक शेतकर्‍यांना दिले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी काळे याच्यावर विश्‍वास ठेवत पैसे भरले व फसले.
शेतकर्‍यांनी काळजी घ्यावी

सौरपंपासाठी शेतकरी योजना उपलब्ध आहे. याचा फायदा घेवून सायबर चोरटे शेतकर्‍यांची फसवणूक करण्याची शक्यता आहे. अशा फसव्या लोकांपासून सावध रहावे, त्यांच्याविषयी काही माहिती असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपी काळे याच्याकडून कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आव्हान पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी केले आहे