यती नरसिंहानंद सरस्वती यांना नगर कोर्टाचा दणका

 यती नरसिंहानंद सरस्वती यांना अहमदनगर जिल्हा न्यायालयाने दणका दिला आहे. यती नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या १५६ (३) नुसार कारवाई करण्याचा आदेश अहमदनगरच्या न्यायालयाने दिला आहे. यु-ट्युबवरील त्यांच्या वक्त्याव्याच्या विरोधात न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली हाेती. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने यासंबंधी कारवाईचा आदेश संबंधित पोलिस ठाण्याला दिला आहे.

बदनामीकारक वक्तव्याचा आरोप
नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात २३ जुलैला भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख आणि अनंत लोखंडे यांनी ही खासगी तक्रार दिली होती. तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये बाजू मांडली. यू ट्युबवरील व्हिडिओवरून यती नरसिंहनंद सरस्वती यांच्याविरोधात प्रथम पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयात धाव घेण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे आयोजित कार्यक्रमात सरस्वती यांनी देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याविषयी बदनामीकारक तसेच प्रक्षोभक, समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याचा आरोप  आहे. 
ही वक्तव्ये देशाच्या एकात्मतेस व मानवतेस धोका निर्माण करणारी असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली होती. 
देशभरात या विरोधात करवाई करण्यात यावी, जेणेकरून यती नरसिंहनंद सरस्वतीसारख्या मानसिकता असणाऱ्या लोकांना चाप बसेल. आता न्यायालयाने याची दखल घेऊन प्रकरण चौकशी आणि पुढील योग्य त्या कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठविले आहे.