पिपरी चिंचवड ची अश्लील भाषेत Reels तयार करणारी 'ती' लेडी डॉन अखेर पोलिसांनी घेतली ताब्यात (Thergaon Queen)



अश्लील भाषा वापरून तयार केलेले व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) अपलोड करणाऱ्या टोळीवर (Gang) अखेर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. यातील दोन तरुणींना पोलिसांनी अटक केली.

'थेरगाव क्वीन' या नावाने अकाउंट चालविणारी साक्षी हेमंत श्रीश्रीमल (रा. थेरगाव), साक्षी राकेश कश्यप (रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या तरुणींची नावे आहेत. तर कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

या टोळीने अश्लील भाषेचा वापर करून तयार केलेल्या व्हिडीओने सोशलमिडीयावर अक्षरश; धुमाकूळ घातला. अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ अपलोड होत आहेत. याप्रकाराबाबत विविध स्तरातून संताप व्यक्त केला गेला. अखेर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तिघांवर गुन्हा दाखल करून दोघीना अटकही केली.

याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाईलवर काही इंस्टाग्राम व्हिडीओ प्राप्त झाले. त्यामध्ये थेरगाव क्वीन या नावाने इंस्टाग्राम अकाउंट चालविणारी साक्षी श्रीश्रीमल, तिच्या सोबत असणारा आरोपी कुणाल कांबळे व साक्षी कश्यप यांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व शब्द वापरलेले व्हिडीओ तयार केल्याचे निष्पन्न झाले. 

त्यामध्ये आरोपींनी धमकीवजा व्हिडीओ बनवून ते स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हायरल केले. हे व्हिडीओ पाहून व एकून समाजातील मुलामुलींची नीतिभ्रष्ट होण्यास व मानिसक स्थिती बिघडण्यास आरोपी कारणीभूत ठरले. 

यामुळे या आरोपींवर अश्लील शिवीगाळ व भाषेचा वापर केलेले व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे, या व्हिडीओमुळे समोरील व्यक्तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे, धमकी देणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातर्गत गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.