कर्जत तालुक्यात कृषीपंपांच्या चोरी प्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक


शेतकऱ्यांच्या (Farmers) कृषी पंपांची (Agricultural pumps) चोरी करून ते भंगारात विकणाऱ्यांविरुद्ध कर्जत पोलिसांनी (Karjat Police) गुन्हा दाखल केला आहे. यात दोन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. कृषिपंप भंगारात विकत घेणाऱ्या एका भंगार व्यावसायिकासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील साईराज मोटार रिवायडिंग या दुकानाच्या मागील उघड्या असलेल्या गोडाऊनमधून वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या पाणबुड्या व इलेक्ट्रिक मोटारी दोन विधीसंघर्षित बालक आणि अजय आप्पा पानसरे, वय- १९ (सर्व रा. राशीन ) व आदींनी चोरल्या. नंतर त्या इबारत मुस्तकीम शेख, वय -३० ( रा.भिगवण ता. इंदापुर) या भंगार व्यावसायिकास विक्री केल्या.
याबाबत राहुल आबासाहेब जांभळकर वय-३० वर्षे (रा. जांभळकरवस्ती, राशिन) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात कलम ३७९, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अजय आप्पा पानसरे व इबारत मुस्तकीम शेख या आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ६० हजार किमतीचे कृषी पंप जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, भगवान शिरसाठ, सहाय्यक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल मारुती काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन वारे, भाऊसाहेब काळे, गणेश भागडे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे आदींच्या पथकाने केली.

कृषी पंपांच्या चोरीचा तपास करण्यात कर्जत पोलिसांना यश आले असले तरी आणखी कृषीपंप जप्त होऊन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे कृषीपंप व केबल चोरीच्या तक्रारी येत आहेत, त्या उघडकीस आणण्यासाठी कर्जत पोलीस प्रयत्नशील असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले.