नागरीकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या आ.आशुतोष काळेंची पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना तंबी
कोपरगाव प्रतिनिधी :- प्रत्येक गावात राजकीय स्थानिक हेवेदावे असतात त्याप्रमाणे गावांतर्गत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतात. यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आपली नेमणूक नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केली आहे याची जाणीव ठेवा आणि जर नागरीकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकांना जनता दरबारात दिली.
एकत्रित जनता दरबारात ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे पंचायत समिती (सर्व विभाग), पशु संवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र (वळूमाता) ह्या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी प्रथमच पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला.याप्रसंगी मतदार संघातील अनेक गावातील नागरीकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या.त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेवून त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे ऐरवी शांत असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदार संघातील जनतेच्या समक्ष कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. संबंधित प्रश्नांचे जाब त्या त्या अधिकाऱ्यांना विचारून तिथेच त्या प्रश्नाला पूर्णविराम देवून त्यांनी जागेवरच नागरीकांचे प्रश्न मिटवले.
नेहमीप्रमाणे या जनता दरबाराला देखील ग्रामीण भागातून नागरीक आपल्या समस्या घेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समस्यांमध्ये सर्वात जास्त प्रश्न घरकुलांचे होते. त्याचबरोबर जल जीवन योजनेचे काम, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची कायमस्वरूपीनेमणूक,रस्त्यांचे प्रश्न,आदिवासी बांधवाना घरकुल मिळावे, आरोग्य विभागाच्या समस्या, नवीन अंगणवाडी मंजूर करणे व जुन्या अंगणवाडी नूतनीकरण करणे, कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा, विवाह नोंदणी वेळेवर केली जात नाही,स्मशानभूमी, शिक्षण विभाग, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच कित्येक कोटींचा विकास निधी अखर्चित आदी प्रश्नांबाबत नागरिकांनी आपल्या समस्या या जनता दरबारात आ.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडल्या. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी तक्रारदार नागरिक व सबंधित ग्रामविकास अधिकारी यांना समोरासमोर घेवून अनेक नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडविल्या.
यावेळी उपस्थित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी चांगलेच कान टोचतांना ते म्हणाले की, मुद्दामहून हा जनता दरबार आयोजित केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना कमीत कमी त्रासात शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे व त्यांच्या अडचणी सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वसामान्य नागरीकांना पक्ष नसतो त्यामुळे त्यांच्याबाबत अजिबात राजकारण होता कामा नये.नागरीकांचे प्रश्न सुटणे गरजेचे असून त्यांचा तोटा होणार नाही याची काळजी घ्या.शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा मिळवून देता येईल अशा पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न करा. योग्य वेळी कामाचा निपटारा झाला पाहिजे. चुकीचे काम करू नका. ज्या त्या गोष्टी वेळेवर झाल्या तर जनता दरबार घ्यायची गरजच पडणार नाही.आज ज्या नागरीकांनी आपल्या समस्या या जनता दरबारात मांडल्या आहेत त्यांच्या समस्यांच्या लेखी अर्जाची एक प्रत सबंधित अधिकाऱ्याला देण्यात येणार असून हे प्रश्न सुटले, का नाही सुटले याची मी स्वत: शहनिशा करणार आहे. त्यामुळे पुढच्या जनता दरबारात या नागरीकांच्या तक्रारी पुन्हा येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्या असा सूचनावजा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी उपस्थित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिला. प्रास्तविक पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे यांनी केले तर आभार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी मानले.
यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.