मतदारांचे आभार मानन्यासाठी आ. आशुतोष काळेंचा सोमवारी ‘कृतज्ञता सोहळा’

मतदारांचे आभार मानन्यासाठी आ. आशुतोष काळेंचा सोमवारी ‘कृतज्ञता सोहळा’

कोपरगाव प्रतिनिधी :- नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सुजाण मतदारांनी पुन्हा एकदा आ.आशुतोष काळे यांच्या हाती मतदार संघाच्या विकासाची दोरी सोपवून त्यांना ऐतिहासिक मताधिक्यांनी निवडून दिले आहे. त्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी सोमवार (दि.२३) रोजी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २.०० वाजता ‘कृतज्ञता सोहळा’ व मतदारांच्या वतीने भव्य ‘नागरी सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.


२०१९ ला कोपरगाव मतदार संघातील मतदारांनी ज्या विश्वासाने आ.आशुतोष काळे यांच्या खांद्यावर मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी दिली.ती जबाबदारी पाच वर्षात इमाने इतबारे पार पाडतांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी व मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करत समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रामाणिक प्रयत्न करून तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणून जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत त्याची साक्ष मतदार संघाची झालेली विकास कामे देत आहेत.


पाच वर्षात झालेल्या विकास कामांची पावती देतांना व मतदार संघाच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत रहावी यासाठी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आ. आशुतोष काळेंच्या पारड्यात भरभरून मतांचा वर्षाव करून तब्बल एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढ्या ऐतिहासिक मताधिक्याने त्यांना निवडून दिले आहे. मतदार संघाच्या इतिहासातील हे सर्वात जास्त जिल्ह्यात नंबर एकचे तर राज्यात पाचव्या क्रमांकाचे मताधिक्य आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी हा ‘कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या कृतज्ञता सोहळ्यासाठी मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे