Shiv Jayanti 2022 शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जाहीर!

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांना उपस्थित राहण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे...
याबाबत गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोमवारी मान्यता दिली. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव (Shiv jayanti) सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
येत्या शनिवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत.
राज्यात करोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) हळूहळू ओसरत असली तरीही सरकराने करोनाचे (Corona) काही निर्बंध अजून शिथिल केलेले नाहीत. तथापि विशेष बाब म्हणून शिवजयंती साजरी करण्यासाठी सरकारने शिवप्रेमींना एकत्र जमण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत २०० जणांना तर शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.