कर्मवीर शंकररावजी काळे कार्यकर्ते घडविणारं चालतं बोलतं ऑक्सफर्ड विद्यापीठ
१०४ व्या जयंती निमित्त कार्यकर्त्यांनी जागविल्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आठवणी कारखाना कार्यस्थळासह विविध ठिकाणी कर्मवीर शंकररावजी काळे यांना जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांकडून आदरांजली
कोपरगाव वार्ताहर :- मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांची १०४ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील स्मृती उद्यान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येवून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत समाजकारणात सक्रीय सहभागी असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी मा.आ.अशोकराव काळे, अनिलराव शिंदे, सौ.स्नेहलताताई शिंदे, आ.आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब कदम, अॅड. प्रमोद जगताप, डॉ.पी.जी.गुंजाळ,संभाजीराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण सर्व संचालक मंडळ उद्योग समुह व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, रयत संकुलातील शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ.स्नेहलताताई शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे,डॉ.पी.जी.गुंजाळ, डॉ.आय.के.सय्यद आदी मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले की, साहेबांचे विचार अतिशय प्रेरणादायी होते. ते नेहमी सांगत आपण पडलो तरी चालेल परंतु पडल्यानंतर उठता आले पाहिजे. साहेब आज शरीराने जरी आपल्यात नसले तरी, त्यांनी शिक्षण, सहकार,कृषी, सिंचन आदी क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या, पाणी प्रश्नासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाच्या व प्रेरणादायी आठवणीच्या रूपाने ते कायम आपल्यात आहेत.
साहेब, कार्यकर्ते घडविणारं चालतं बोलतं ऑक्सफर्ड विद्यापीठ होते. या विद्यापीठात कर्तव्य, नैतिकता आणि परोपकाराची शिकवण देवून साहेबांनी अनेक कार्यकर्ते घडविले, त्यांना स्वत:ची ओळख निर्माण करून दिली असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात साहेबांच्या कार्यांचा सुगंध आजही दरवळत आहे. सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केले, त्यांना राजकारणात संधी दिल्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याला पोटच्या मुलापेक्षा जास्त प्रेम दिले. त्यांच्याकडे असणारे गुण कार्यकर्त्यांना बळ देणारे होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेची सेवा करतांना रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना दिलेला शब्द पूर्ण करून स्वत:च्या शिक्षण संस्था न काढता रयत शिक्षण संस्थेची भरभराट करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर कर्मवीर शंकररावजी काळे यांनीच रयत शिक्षण संस्थेला मोठं केले. ते परीस होते त्यांच्या पदस्पर्शाने कारखाना परिसराचे नंदनवन झाले. समाजकारण करीत असतांना त्यानी कधीही जात, पात, धर्म पाळला नाही. आलेल्या व्यक्तींच्या अडचणी कशा सुटतील व त्याच्या चिंता कशा दूर होतील यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करीत असत.
त्यांनी नेहमी सर्वसामान्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले म्हणूनच ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी ठरले आहेत. कोपरगाव तालुक्याच्या विकासाला सातत्याने त्यांनी डोळ्यासमोर ठेवतांना पाणी प्रश्नासाठी आपलं आयुष्य वेचलं. साखर कारखान्याची उभारणी करून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र आर्थिक परिवर्तन घडवून परिसराचे नंदनवन केले.सहकारी साखर कारखानदारी सक्षमपणे चालवितांना सहकार चळवळ जोपासली. कारखान्याला नफा नाही झाला तरी चालेल मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची सदैव काळजी घेवून शेतकऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांचे हित जोपासून समाजाप्रती असलेली आत्मीयता व दूरदृष्टी कशी असावी हे साहेबांकडे पाहिल्यास लक्षात येते. त्यामुळे ते केवळ कर्मवीरच नव्हे तर कर्मयोगी व राजकारणातील संत होते. पाणी प्रश्नासाठी ते आयुष्यभर लढले त्यांचे हेच गुण आ.आशुतोष काळे यांच्यामध्ये असल्याचे कार्यकर्त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले. सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले तर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले