राहात्यातून महाविद्यालयीन युवक बेपत्ता

कॉलेजला जातो असे म्हणून घराबाहेर पडलेला एक १७ वर्षीय महाविद्यालयीन युवक राहाता येथून बेपत्ता झाला आहे. तो बेपत्ता झाल्याची फिर्याद राहाता पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
ओम विजय देशमुख (वय १७) असे या बेपत्ता युवकाचे नाव आहे. तो तालुक्यातील कोऱ्हाळे येथे एका महाविद्यालयात १२ वीत शिकतो. मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता तो राहाता येथील साईनाथनगर येथील घरातून कोऱ्हाळे येथे महाविद्यालयात जाण्यासाठी निघाला. परंतु मंगळवारी उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्याचे वडील रुई येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक विजय केशवराव देशमुख यांनी मित्रांच्या मदतीने शोध घेतला. तो महाविद्यालयात आलाच नसल्याचे त्याच्या प्राध्यापकाने सांगितले.
त्यामुळे इतरत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे त्यांनी राहाता पोलीस ठाण्यात मुलगा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची फिर्याद राहाता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा रजि. नंबर ४६/२०२२ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम रंगाने सावळा असून उंची ५ फूट ४ इंच आहे. चेहरा उभट, केस मध्यम वाढलेले, अंगामध्ये निळ्या रंगाचे जॅकेट व पिवळ्या रंगाचा फुल्ल शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायामध्ये पिवळसर रंगाचा स्पोर्ट्स शुज, निळ्या रंगाची दप्तरची सॅक याप्रमाणे त्याचे वर्णन आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉ. दिलीप तुपे करत आहेत.