थेरगाव क्वीनसारखी ५० अकाउंट रडारवर! या व्हिडीओचा तपास सुरु

लाईक्स आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी सध्याची तरुण पिढी काय करेल, याचा नेम नाही. त्याचा प्रत्यय गेल्या महिन्याच्या शेवटास पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) पोलिसांना आला. थेरगाव क्वीन असे नाव इन्स्टावर धारण करून आपली मैत्रिण व मित्राच्या मदतीने अश्लील व धमकीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले होते. त्यामुळे पोलिसांनी या तिघांनाही ३० जानेवारीला पकडले होते. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. आता पुन्हा या थेरगाव क्वीनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोलिसांनाच (Police) आव्हान देणारा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यामुळे लॉकअपबाहेर येताच थेरगावची राणी पुन्हा सक्रिय झाली की काय अशी चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी, मात्र ही चर्चा व शक्यता खोडून काढली. कारण थेरगाव क्वीन साक्षी हेमंत श्रीमल (वय १८, रा. पवारनगर, थेरगाव) हिचे आक्षेपार्ह इन्स्टा अकाउंट तिला अटक झाल्यानंतर लगेचच बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दुसऱ्या या नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याचा त्यांचा संशय आहे. अशा पन्नास थेरगाव क्वीन इन्स्टावर असल्याची माहिती वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आज दिली. त्यामुळे त्यापैकी एका अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यातत आला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, हे अकाउंट तपासणीसाठी पाठवले गेले असून त्यातून ते कोणाचे आहे. याचा उलगडा होताच कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सायबर गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी सोशल मिडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मिडिया (Social Media) सेल स्थापन केला आहे. त्यांनाच या दोन साक्षींचा हा प्रताप आढळला होता. तर, नुकतेच या सेलने सोशल मिडियात कोयता हातात मिरवणाऱ्या तरुणावरही अशीच कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी थेरगाव क्वीन या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ हा साक्षी श्रीमल हिला पोलिस अटक केल्यानंतर घेऊन जातानाचा आहे.