सरकारी योजनेअंतर्गत सौरपंप देतो, अशी बतावणी करून माझी फसवणूक केली असल्याची फिर्याद राक्षी (ता. शेवगाव) येथील एका शेतकर्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डि) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरूण सांगळे, भगवान कोंडर, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर आरोपी काळे याचे निष्पन्न झाले. त्याला पथकाने अटक केली आहे.
अशी केली फसवणूक
शेतकर्यांना सौरपंप मिळावे यासाठी सरकारी योजना उपलब्ध आहेत. याचा गैरफायदा घेत किशोर काळे याने एक वेबसाईट तयार केली. त्या वेबसाईटची जाहीरात करून त्याने जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांचा विश्वास संपादन केला. या वेबसाईटद्वारे अनेक शेतकर्यांना लाखो रूपयांचा गंडा घातला गेला आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आव्हान पोलीस निरीक्षक भोसले यांनी केले आहे