आजी आजारी आहे, तपासायला घरी चला म्हणत केले डॉक्टर चे अपहरण!

 
 ‘आमची आजी आजारी असून तिला तपासायला घरी चला,’ असे सांगून सात जणांनी शिरूरमधील एका डॉक्टरचे अपहरण (kidnap) केले. त्यांना मारहाण करत सुमारे तीन लाखांची खंडणी (ransom) त्यांच्याकडून वसूल केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. ही घटना शुक्रवारी (ता. ४ फेब्रुवारी) मध्यरात्री घडली. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य सूत्रधाराला गजाआड केले. (Doctor kidnapped for ransom in Shirur)
अटक केलेल्या मुख्य सूत्रधाराचे नाव कुणाल सुभाषसिंग परदेशी (वय २५, रा. शिरूर) असे आहे. शिरूर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश, मयूर, राहुल, यश, दानिश (पूर्ण नाव व पत्ता समजू शकले नाही) यांच्यासह त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. येथील डॉ. संदीप तुळशीराम परदेशी (वय ५९, रा. मारुती आळी, शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
डॉ. संदीप परदेशी हे हॉस्पिटलमध्ये असताना रात्री नऊच्या सुमारास दोन तरुण हॉस्पिटलमध्ये आले. ‘आजी आजारी असल्याने तपासायला घरी चला’ असे म्हणून त्यांनी डॉ. परदेशी यांना आपल्या सोबत येण्याची विनंती केली. डॉ. परदेशी हे स्वतःच्या दुचाकीवरून त्यांच्या मोटारीच्या मागे जात असताना, सिद्धार्थ नगरजवळ दोघा तरुणांनी मोटार थांबवून डॉक्टरांना आपल्या मोटारीत बसण्यास बजावले. त्यांनी विरोध केला असता कोयत्याचा धाक दाखवले. त्यांना घेऊन ते घोडनदी किनारी नेले. तेथे आणखी चार ते पाचजण होते. त्यांनी मारहाण करून डॉ. परदेशी यांना शिरूर-न्हावरे रस्त्यावरील कर्डे घाटात नेले.
अपहरणकर्त्यांनी पुन्हा त्यांना मोटारीत बसवून पुणे-नगर रस्त्याने सतरा कमानीच्या पुलाच्या दिशेने नेले. तेथे नेल्यावर पुन्हा पैशांची मागणी केली असता डॉ. परदेशी यांनी चालकाला फोन करून तीन लाख रुपयांची जमवाजमव करायला सांगितले. ते पैसे अपहरणकर्त्यांनी आपल्या एका साथीदाराकडे देण्यास सांगितले व शिरूर बायपास नजीक डॉ. परदेशी यांना सोडून दिले.
दरम्यान, डॉ. परदेशी यांनी हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत संशयितांच्या मागावर पोलिस पथके रवाना केली. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कुणाल परदेशी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासह सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उंदरे करीत आहेत.