दांडियामध्ये ओळख झालेली मुलगी बोलत नसल्याच्या रागातून एकाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी या घटनेनंतर अवघ्या दोन तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या. मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
आरोपी हा 22 वर्षीय तरूण असून त्याने हल्ला केलेली युवती ही अल्पवयीन आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी दांडियामध्ये या दोघांची ओळख झाली होती. मुलीच्या घरातल्या सदस्यांनी तिला या तरुणाशी बोलण्यास, संपर्कात राहण्यास मज्जाव केला. त्यानंतर या युवतीने या मुलाशी बोलणे सोडून दिले होते. अचानकपणे युवतीने बोलणं सोडून दिल्यामुळे आरोपी संतापला होता. रागाच्या भरात आरोपीने युवतीवर धारदार चाकूने वार केले.
या हल्ल्यात युवती जखमी झाली. युवतीवर हल्ला झाल्यानंतर आरोपी शहरातून पळ काढण्याच्या तयारीत होता. अखेर विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. विमानतळ पोलिसांनी लोहगाव फॉरेस्ट पार्कमधून अटक केली.