कोपरगाव तालुक्यातील 'या' दहा गावांना रस्त्यांसाठी १ कोटी निधी- ना. आशुतोष काळे




कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला असून रस्ते विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.


कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधि मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्या प्रस्तावाची दखल घेवून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत १ कोटी रुपये निधी दिला आहे. यामध्ये 

बक्तरपुर येथील रामभाऊ सानप वस्ती ते श्रावण मोरे वस्ती, 

वडगाव येथील बाळू जाधव वस्ती ते सखाहारी सोनवणे वस्ती, तसेच साहेबराव सानप वस्ती ते रविंद्र पवार वस्ती, 

माहेगाव देशमुख येथील मच्छिंद्र डांगे वस्ती ते गावित्रे वस्ती, कोळगाव थडी येथील निंबाळकर वस्ती ते जुने गावठाण, 

कुंभारी येथील पुंजाराम पवार वस्ती ते भीमराज पवार  वस्ती, कासली येथील नंदू वायदेशकर वस्ती ते मगन साळवे वस्ती, 

शिरसगाव येथील यशवंत चंदनशिव वस्ती ते काटवनी वस्ती रस्ता, 

कान्हेगाव येथील अशोक काजवे वस्ती ते राधाकिसन सोळसे वस्ती, 

घोयेगाव येथील एक्स्प्रेस कॅनॉल ते लालुबाबा सोळसे वस्ती या रस्त्यांच्या खडीकरणासाठी प्रत्येकी १० लाख याप्रमाणे १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. 

त्याबद्दल मतदार संघातील जनतेच्या वतीने ना. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना. धनंजय मुंडे,  सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. विश्वजित कदम यांचे ना. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष मोठा आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी वाड्या वस्त्यांपासून सर्व प्रमुख मार्गांचा विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून करीत असलेल्या प्रयत्नांना महाविकास आघाडी सरकारकडून सहकार्य मिळत असल्यामुळे रस्त्यांसाठी आजपर्यंत ९५ कोटीचा निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. यापुढील काळात देखील विविध विभागाकडून रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.