कोपरगाव मतदार संघातील सबस्टेशन शहा सबस्टेशनला जोडण्याचे काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना वीज द्या आ.आशुतोष काळेंच्या सूचना
कोपरगाव प्रतिनिधी – माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील शहा येथे उभारण्यात आलेल्या १३२ के.व्ही.ए.सबस्टेशनला कोपरगाव मतदार संघातील सबस्टेशन जलद गतीने जोडा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी कार्यकारी अभियंता थोरात यांना दिल्या आहेत.
कोपरगाव मतदार संघातील २२० केव्हीएचे सबस्टेशन ओव्हरलोड असल्यामुळे वीज पुरवठ्यात खंड पडुन त्याचा त्रास शेतकऱ्यांना,वीज ग्राहकांना व छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायाला होवून त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात १३२ के.व्ही.ए.चे सब स्टेशन उभारण्यास मंजुरी मिळविली होती परंतु हे सबस्टेशन दुर्दैवाने सिन्नर तालुक्यात शहा येथे उभारण्यात आले. या सबस्टेशनला कोपरगाव मतदार संघातील ओव्हरलोड सबस्टेशन जोडले जावे व २५ एम. व्ही.ए.क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एम. व्ही.ए.क्षमतेचे करावे यासाठी कृषी मंत्री ना. माणिकरावजी कोकाटे व आ.आशुतोष काळे यांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू होता.
त्या पाठपुराव्यातून २५ एम. व्ही.ए.क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एम. व्ही.ए.क्षमतेचे करण्यास मंजुरी मिळालेली आहे.शहा सबस्टेशनला कोपरगाव मतदार संघातील कोळपेवाडी चास नळी व पोहेगाव सब स्टेशन जोडण्याचे काम सुरू आहे. सदरचे काम तातडीने पूर्ण करून कोपरगाव मतदार संघातील नियोजित सबस्टेशन या सबस्टेशनला जोडून शेतकऱ्यांना वीज द्या.
शहा येथे १३२ के.व्ही.ए.चे सबस्टेशन कार्यान्वित होवून जवळपास वर्षभराचा कालावधी होत आला आहे. या सबस्टेशनला कोपरगाव तालुक्यातील सबस्टेशन जोडण्याच्या सुरू असलेल्या कामातील अडचणी दूर करून त्या कामांना गती द्या. शहा सब स्टेशन वरून वीज वाहिन्या सिन्नर तालुक्यातील पाथरे गावापर्यंत आल्या आहेत या वीज वाहिन्या आठ दिवसात पोहेगाव सब स्टेशनला जोडा तसेच ज्या ठेकेदारांनी शहा सब स्टेशनच्या २५ एम. व्ही.ए.क्षमतेचे ट्रांसफार्मर ५० एम. व्ही.ए.क्षमतेचे करण्याचे काम घेतले आहे ते काम देखील जलद गतीने काम पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कार्यकारी अभियंता थोरात व संबंधित ठेकेदारांना दिल्या आहेत.