राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर शुक्रवार (दि.२५) रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर शुक्रवार (दि.२५) रोजी करणार उमेदवारी अर्ज दाखल

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) उमेदवारी जाहीर करण्यात येवून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख ठरली असून शुक्रवार (दि.२५) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पुढील महिन्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी मंगळवार दि.२२ ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि.२९ ऑक्टोबर असून या कालावधीत उमेदवार आपले उमेदवारी अर्ज भरू शकतात. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून (अजितदादा पवार गट) सोमवार (दि.२१) रोजी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्याच यादीत आ. आशुतोष काळे यांच्या नावाचा समावेश असून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांचा उमेदवारी अर्ज याच आठवड्यात भरला जाणार आहे.

आ.आशुतोष काळे यांनी अविरत प्रयत्न करून कोपरगाव मतदार संघातील बहुतांश रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आदी विकासाचे मुलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत आणि हा विकास मतदार संघातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या अडी-अडचणी सोडवून मतदार संघाला विकासाची दिशा दाखवण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार म्हणून पक्ष श्रेष्ठींनी त्यांची उमेदवारी मागील काही महिन्यापूर्वीच जाहीर केलेली आहे. तेव्हापासूनच आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारात सक्रीय राहण्यासाठी शुक्रवार (दि.२५) रोजी आ.आशुतोष काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणाहून शहराच्या मुख्य मार्गावरून अहिंसा स्तंभ, गुरुद्वारा रोड मार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून आ.आशुतोष काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ज्याप्रमाणे मतदार संघाच्या विकासासाठी आ.आशुतोष काळे यांनी आजपर्यंतच्या इतिहासात निधी मिळवितांना ऐतिहसिक कामगिरी केली आहे. त्याप्रमाणे होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ऐतिहासिक मताधिक्य देवून निवडून आणण्याचा निश्चय महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे.या कार्यक्रमासाठी महायुतीतील कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी केले आहे.