पोलिसांच्या दुर्लक्षात अवैध धंदे जोमात; कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याच्या मानसिकतेमुळे अनेकांचा वाढला कल

पोलिसांच्या दुर्लक्षात अवैध धंदे जोमात; कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याच्या मानसिकतेमुळे अनेकांचा वाढला कल

कोपरगाव प्रतिनिधी :कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे गेल्या काही वर्षांत कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेकांचा कल नव्याने वाढला आहे. त्याचाच फायदा घेत ब्राम्हणगावात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. अशा धंद्याकडे तरुणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणू मोकळे रानच मिळाले आहे.

यामुळे आता ब्राम्हणगावात अवैध धंद्यांना पोलिसांनीच नाहरकत दिली की काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.ब्राम्हणगाव व परिसरातील तरुण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय दारूविक्री, गुटखा, जुगार, मटका अशा अवैधधंद्याकडे मात्र त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पानटपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो, असा त्यांचा समज आहे. त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेने उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे.


मात्र या व्यसनांच्या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातूनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारीकडेही वळत आहे. या अवैध धंद्याच्या नादी लागून कित्येक तरुण दिवसभर आकडेमोडीच्या गणिताचा अभ्यास करीत असतात. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब उद्ध्वस्त केले आहेत, तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालवण्यात येतात. त्यानंतर मात्र परिस्थिती जैसे थे असते. गावच्या गावठाण हद्दीत खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहेत, मात्र असे असतानाही पोलिस ठाण्याकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते