कोरोना कालखंडात गत अडीच वर्षापासून आमदार आशुतोष काळे यांचा जनता दरबार संपन्न झालेला नाही त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून या निमित्ताने सर्वच विभागाच्या समस्या माध्यमांसमोर येणार असून त्यात खरे चित्र समोर येते असा अनुभव आहे.
वर्तमानात वीज,रस्ते,शेती सिंचनाचे पाणी आदी प्रश्नाने शेतकरी हैराण झालेले आहेत.त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमके तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु झाले आहे.त्यामुळे या जनता दरबाराकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
मतदार संघातील अनेक नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये विविध प्रकारची कामे असतात.सर्वसामान्य नागरिक,अपंग व्यक्ती,विधवा महिला,जेष्ठ नागरिक,माजी सैनिक,शेतकरी अशा सर्व स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने जावे लागते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक,महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न तातडीने निकाली निघावे यासाठी ना. काळे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे.
मागील दोन वर्षापासून वैश्विक कोरोना संकटामुळे संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून बहुतांश निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत.
त्यामुळे जनता दरबार घेण्याचा निर्णय ना.काळे यांनी घेतला आहे.सर्व नागरिकांचे प्रश्न सुटावे यासाठी नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या असे आवाहन त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.