कोपरगावच्या रस्त्यांच्या कामांमध्ये ना.भुजबळ साहेबांच्या येवल्यातील रस्त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार - ना.आशुतोष काळे

मतदार संघातील रस्ते कसे असावेत याचे उत्तम उदाहरण येवला मतदार संघातील रस्त्यांकडे पाहिल्यावर येते. त्यासाठी ना. छगनरावजी भुजबळ यांनी दिलेले योगदान माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी आहे. कोपरगावच्या रस्ते विकासात ना. भुजबळ साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे केले.


नाटेगाव येथे प्ररामा २ ते देशमाने-मानोरी-मुखेड-महालखेडा-निमगाव मढ-नाटेगाव ते प्ररामा ८ या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना ना. आशुतोष काळे म्हणाले की, येवल्याचे रस्ते राज्यात प्रसिद्ध आहेत ते ना. छगनरावजी भुजबळ यांच्यामुळेच. ज्यावेळी येवला मतदार संघात भुजबळ साहेब निवडून आले त्यावेळी येवला मतदार संघातील रस्त्यांची अवस्था देखील कोपरगाव विधानसभा मतदार संघासारखीच होती. मात्र आज हाच येवला मतदार संघ राज्यासाठी रस्त्यांच्या बाबतीत आदर्श ठरला आहे. येवला मतदार संघातील वाड्या-वस्त्यापासून ते मुख्य रस्त्यांपर्यंत असलेले चकचकीत रस्ते मतदार संघाच्या विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. हाच आदर्श डोळ्यसमोर ठेवून मागील दोन वर्षापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्त्यांची झालेली दुरावस्था सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून जवळपास ९५ कोटी रूपये निधी रस्त्यांसाठी आणला असून त्या निधीतून अनेक मुख्य रस्त्यांबरोबरच बहुतांश गावातील रस्त्यांचे व वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची कामे सुरु आहेत.

 प्ररामा ८ या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी निधी मिळावा यासाठी मी देखील प्रयत्न केले होते. मात्र प्ररामा ८ येवला तालुक्यात सुरु होवून कोपरगाव तालुक्यात संपत असल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ व भुजबळ साहेबांच्या सहकार्याने या रस्त्यासाठी निधी मिळाला असून या निधीतून रस्त्यांची कामे होवून नागरिकांच्या अडचणी सुटत आहेत याचे मोठे समाधान असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी नाटेगाव येथे १६ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या इजिमा १२ किरण कुदळे घर ते राजेंद्र मोरे घर रस्ता व १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या नाटेगाव ते प्ररामा ८ रस्ता, ग्रामा ८२ मध्ये किमी ०/०० ते १/५०० रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन आणि ८.७५ लक्ष रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा खोलीचे लोकार्पण ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक विठ्ठलराव आसने, संजय आगवन, पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, रावसाहेब मोरे, किरण कुदळे, जयवंत मोरे, जालिंदर उळेकर, तुकाराम मोरे, विलास मोरे, किरण मोरे, गणेश मोरे, संतोष मोरे, अशोक मोरे, शिवाजी मोरे, राहुल जगधने, सुभाष मोरे, सतीश मोरे, प्रभाकर मोरे, दिनकर मोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता सी.डी. लाटे, केंद्रप्रमुख विद्या भोईर, मुख्याध्यापक विजय पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते