कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सकाळी व रात्री थंडी तर वातावरणात दिवसभर गारवा जाणवत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम जाणवत आहे. सध्या खासगी व सरकारी रुग्णालयांत सर्दी, ताप व खोकला तसेच डोकेदुखीचे रूग्ण दिसून येत आहेत. हा हवामान बदलाचा परिणाम की अन्य कारण आहे याबाबत नागरिकांमधून तर्क-वितर्क लावले जात आहे. वेळीच याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात मागील काही दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे.. हिवाळ्याचा अंतिम टप्पा अन् उन्हाळ्याचा प्रारंभ यामुळे सर्वत्र वातावरणात बदल झाला. सकाळी व रात्री थंडी तर दिवसभर थंड वातावरण मानवी आरोग्यावर परिणामकारक ठरत आहे. यामुळे ताप सर्दी, खोकला, डोकेदुखी याचा त्रास अनेकांना होवू लागला आहे.
वातावरणात धुलिकण पसरले
पाकिस्तानात आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका आपल्या देशालाही बसला. जिल्हा व तालुका याला अपवाद नव्हता. सकाळी काही भागात धुके दिसून आले. दिवसभर वातावरणात गारवा होता. दिवसाही थंडी जाणवत होती. जोराचा वारा आणि त्यात मातीचे धुलिकण दिसून येत होते. असे विचित्र वातावरणाचा अनुभव नागरिकांनी घेतला. असे वातावरण राहिल्यास याचा घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहेत.
खाजगी व सरकारी रुग्णालयांत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यातच पुन्हा करोनाची तिसरी लाट आली असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होत आहे. व्हायरल इन्फेक्शन की करोनाची लक्षणे यामुळे मोठा संभ्रम वाढत आहे. काहींना करोनाची लक्षण असली तरी व्हायरल समजून करोनाचे उपचार न घेतल्यास यातून करोनाचे पेशंट वाढण्याची भिती आहे. करोनाचे निर्बंध पाळतांना नागरिक दिसत नाही. सरकारने निर्बंध घातले असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, गर्दी करणे हे प्रकार सर्रास दिसून येत आहे. लसीकरणामुळे सौम्य लक्षणे दिसत असली तरी रुग्णवाढ होणे गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक लसीकरणानंतरही दगावत असल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी करोनाचे निर्बंध पाळण्याची गरज आहे. तालुका प्रशासन वेळोवेळी आवाहन करुनही अजूनही नागरिक गांभिर्याने घेताना दिसत नाही.