जनार्दन जगताप यांना राज्यस्तरीय “पत्रकार भूषण” पुरस्कार पुणे येथे आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

जनार्दन जगताप यांना राज्यस्तरीय “पत्रकार भूषण” पुरस्कार पुणे येथे आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमात पुरस्कार प्रदान.

कोपरगाव प्रतिनिधी -: महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व पिंपरी चिंचवड शहर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्यावतीने देण्यात येणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर “पत्रकार भूषण” राज्य स्तरीय पुरस्कार कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार जनार्दन जगताप यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पुणे येथे प्रदान करण्यात आला.

दि.६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पुणे येथील ग.दि.माडगुळकर सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते किरण माने, राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,सरचिटणीस डॉ.विश्वास आरोटे, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, न्यूज १८ लोकमत चे आऊटपुट एडिटर अमित मोडक, बी.बी.सी. मराठीचे संपादक अभिजीत कांबळे, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, झी २४ तास चे संपादक कमलेश सुतार, आदींच्या प्रमुख उपस्थितीत उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.


राज्यातील वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करणारे संपादक,ज्येष्ठ पत्रकार आदींच्या कार्याची दखल घेऊन वरील दोन्ही संघटनेच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये जनार्दन जगताप यांना पुरस्कार मिळाल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा प्रतिक्रिया समाजातील विविध घटकांमधून व्यक्त होत आहेत.


पत्रकार जगताप हे सन १९९० पासून पत्रकारितेशी जोडले गेलेले आहेत. त्यांनी लोकमत साठी सन १९९० मध्ये महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून सुरुवात केली असून सामना,गावकरी,पुण्यनगरी,पुढारी,सार्वमत आदी वृत्तपत्रासाठी वार्तांकन केले आहे.सामाजिक, राजकीय, अध्यात्मिक अशा विविध विषयावर त्यांनी वार्तापत्र लेखन केले आहे. यामध्ये विशेषतः सार्वजनिक समस्या तसेच अध्यात्मिक बातम्या विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.सुमारे ३३ वर्षे त्यांची पत्रकारिता चालू असून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.समाजाला अध्यात्माची तसेच धार्मिक परंपरा या विषयी माहिती व्हावी यासाठी बातम्यांची प्रसिध्दी देण्यावर त्यांचा नेहमी भर राहिला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी राज्यभरातून पत्रकार बांधव, जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळें,पत्रकार किसन पवार यांचेसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.