शेतकर्यांची वीज तोडण्याचा लेखी आदेश तुझ्याकडे आहे का? राज्य सरकारने काढलेले परिपत्रक तू वाचले का? वीज तोडण्याआधी आधी नोटीस द्यावी लागते, हे तुला मान्य आहे ना? मग अशी नोटीस तू का दिली नाही? तुझ्यावर 302 अन्वये गुन्हा का दाखल करू नये?..
अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महावितरणचे सहायक अभियंता भराट यांना धारेवर धरले.
तसेच भराट यांचे वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता कोपनर यांनाही फोनवरून सुनावताना, मी येथे अर्धा तासापासून बसलोय, तुम्हाला जिल्हाधिकार्यांनी माझा दौरा दिला नव्हता का ?
नेमकी अकोळनेरचीच वीज का तोडली, असे सवालही केले. दरम्यान, जाधव परिवाराला दिलासा देताना मुलांच्या शिक्षणासह सर्व अडचणी सोडवण्याची ग्वाही दिली व पुन्हा तुमच्या घरी येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
अकोळनेर येथील पोपट जाधव या शेतकर्याने पाणी असूनही वीज नसल्याने शेतातील कांदा पिकाला पाणी देता येत नाही, या दुःखातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तीन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. त्यांच्या कुटुंबाची भेट दानवे यांनी गुरुवारी दुपारी घेतली. यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे व अन्य यावेळी उपस्थितहोते.
यावेळी जाधव परिवारातील सदस्य व महिलांनी तसेच उपस्थित गावकर्यांनी जाधव यांना झालेल्या त्रासाची माहिती दिली. त्यांनी शेतात कांदे लावले होते. पण वीज नसल्याने दोन-तीन दिवसांपासून ते अस्वस्थ होते. महावितरणने रोहित्राचीच वीज कट करून टाकल्याने पाणी
असून ते देता नसल्याच्या दुःखातूनत्यांनी जीवन संपवले. त्यांचा मुलगा बी. एस्सी झाला असून, शेती पाहतो व मालधक्कयावरही काम करतो तर धाकटा मुलगा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने घराला कोणीही वाली राहिलेला नाही, असे दुःखही त्यांनी व्यक्त केले. जाधव यांना न्याय मिळावा, मुलाच्या शिक्षणाला मदत व्हावी, अशी मागणीही केली.
नागरिकांनी केल्या तक्रारी
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दानवेंसमोर अकोळनेरच्या वीज पुरवठ्याबाबत विविध तक्रारी केल्या. मागच्यावर्षी येथे 90 टक्के वसुली होती. यंदा पावसाने खरीपाची पिके हाती लागली नाही व आता रब्बीची आशा असताना पाणीअसूनही वीज नसल्याने अडचणी होत आहे. जाधव परिवाराने आतापर्यंतचे सर्व वीज बिलभरले आहे, पण यंदा अवकाळी पावसाने मूग व बाजरी व अन्य खरीप पिकांचे नुकसान झाल्याने आठ-दहा हजाराचे बिल थकीत आहे. पण महावितरणने डीपीचीच वीज बंद करून टाकली आहे.
त्यामुळे विहिरीला पाणी उपलब्ध असूनही शेतातील पिकाला देता येत नाही. याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांना जाब विचारला तर तेच शेतकर्यांवर सरकारी कामात अडथळे आणल्याचे गुन्हे दाखल करतात, असा उद्वेग यावेळी व्यक्त करण्यात आला. डीपीचे फ्युज शेतकरी स्वखर्चाने लावतात,
कोणीही कर्मचारी येथे येत नाही. जाधव यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनाने धुडकावून लावली. आधी पोलिसांनी त्यांच्या मुलाचा जबाब घेतला व नंतर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला, अशी तक्रारही यावेळी कार्ले यांनी केली. पाऊस थांबल्यावर शेतकर्यांनी शेतीची मशागत करून पेरणी केल्यानंतर डीपी बंद करून शेतकर्यांची अडवणूक केली.
जाधव यांच्या आत्महत्येनंतर शासनाचा एकही प्रतिनिधी त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी आला नाही, त्यामुळे प्रशासनातील दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.