मुंब्रा रेल्वे स्थानकावर एका धक्कादायक घटनेमध्ये एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंब्रा रेल्वे स्थानकावरील हा धक्कादायक घटनाक्रम सीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाला उपनगरीय रेल्वेगाडीने जोरदार धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. मळमळल्यासारखं वाटू लागल्याने उलटी करण्यासाठी पलाटावरुन रेल्वे रुळावर वाकलेला असतानाच या तरुणाला एसी लोकलने ट्रेनने धडक दिल्याचं सीसीटीव्ही व्हिडीओत दिसत आहे.
रामेश्वर देवरे (२२) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूने संपूर्ण मुंब्रा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंब्र्यातील एम. एम. व्हॅली येथे मौलाना अब्दुल कलम आझाद क्रिडाप्रेक्षागृहात २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबरपर्यंत अग्निवीर भरतीची प्रक्रिया सुरु आहे. या भरतीसाठी धुळ्याहून रामेश्वर आला होता. रामेश्वर मुंब्रा स्थानकात बसला असताना त्याची तब्बेत अचानक बिघडली आणि त्याला उलटी होऊ लागली. उलटी करण्यसाठी रामेश्वरने रेल्वे रुळाच्या दिशेने धाव घेतली. उलटी करत असताना त्याचे उपनगरीय रेल्वेगाडीने त्यास जोरदार धडक दिली. या धडकेत रामेश्वर याचा मृत्यू झाला आहे. तुम्हीच पाहा हा या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज…
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.