डिसले गुरुजींच्या अडचणींमध्ये वाढ ! ZP सदस्य झाले आक्रमक : परितेवाडी गावा संदर्भात दिली चुकीची माहिती , बदनामी केल्याचा आरोप


 रजेसाठी माझा मानसिक छळ केला, पैसे मागितले, या आरोपानंतर आता ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjit Singh Disale) यांची परितेवाडी (ता. माढा) शाळेसंदर्भातील नवी माहिती समोर येत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार आणि डिसले गुरुजी यांच्यापुरता मर्यादित असलेल्या विषयात आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखी जास्त गूढ उकलत जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. (Solapur ZP member aggressive against Disale Guruji)
डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कार मिळविण्यासाठी सादर केलेल्या माहितीमध्ये परितेवाडी आदिवासी बहूल परिसर, कन्नड भाषिक गाव आणि विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आत्मसात केलेली कन्नड भाषा, गोठ्यात भरणारी शाळा, गावात होणारे 80 टक्के बालविवाह, दारिद्रय रेषेखालील लोकांचे गाव यासह इतर मुद्दे नोंदविल्याची माहिती आता समोर येऊ लागले आहे.

यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे म्हणाले की, परितेवाडी गाव हे माझ्या मतदार संघात आहे. गावातील लोक सधन आहेत, गावात द्राक्षाच्या बागा आहेत. गावातील बहुतांश लोक गवंडी काम करतात; परंतु त्यांना या कामातून मिळणारा रोजगार चांगला असल्याने गावाचे दरडोई उत्पन्न चांगले आहे. गावात दोन ते चार घरे इतर समाजाची असून उर्वरित गाव मराठा समाजाचे आहे. पुरस्कारासाठी दिलेली माहिती चुकीची असल्याचे समारे आल्याने या प्रकरणाची उत्सुकता आणखी वाढविली आहे.
जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख यांनी या प्रकरणात सीईओ देशमुख यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक करत सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव केला आहे. हा ठराव मांडत असताना डिसले गुरुजींच्या कार्यपद्धतीवर नाराजी व जिल्हा परिषदेची बदनामी केली म्हणून निषेध व्यक्त केला आहे.

मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव
डिसले गुरुजींच्या रजा प्रकरणात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकार नसताना हस्तक्षेप केला. त्यांना रजा देण्याचे आदेश त्यांनी सीईओ दिलीप स्वामी यांना दिल्याचा मुद्दा पुढे करत जिल्हा परिषद सदस्य प्रा. सुभाष माने यांनी मंत्री गायकवाड यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. डिसले गुरुजी हे ग्रामविकास विभागात कार्यरत असताना मंत्री गायकवाड यांनी या प्रकरणात अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोपही प्रा. सुभाष माने यांनी केला आहे.

ग्लोबल पुरस्काराची रक्कम कुठे आहे?, गुरुजी परदेशात गेले होते का?, शाळेवर व प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी नसताना पगार कसा काढला? यासह अनेक गंभीर प्रश्‍न जिल्हा परिषद सदस्य प्रा. माने यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे शिक्षण विभागाकडून मिळत नसल्याचे प्रा. माने यांनी सांगितले.