Velentine Week Fever कॉलेज युवतीची काढली छेड ! तिच्या भावाला पण केली मारहाण !

महाविद्यालयीन युवतीची छेडछाड करून तिच्या दोघा भावांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. यापकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कासारा दुमाला परिसरात राहणारी एक युवती संगमनेर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
सदर युवती शनिवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास कॉलेज संपल्यानंतर घरी जात होती. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. अनिकेत दळे, अनिकेत मंडलीक, साई सूर्यवंशी यांनी सदर युवतीची छेडछाड केली. आपल्या बहिणीला काही युवक त्रास देत असल्याचे समजताच याच महाविद्यालयात शिकणारा तिचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ प्रवेशद्वारासमोर आले. यामुळे संतापलेल्या युवकांनी युवतीच्या भावाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
यातील एकाने हातातील चाकूने गळ्यावर मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो थोडा मागे सरकल्याने तो बालंबाल बचावला. अनिकेत गायकवाड याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ केली. आमच्या नादी लागले तर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी आरोपींनी दिली. याबाबत सदर युवतीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिकेत दळे, अनिकेत मंडलीक, साई सूर्यवंशी व इतर (सर्व अकोले नाका भिलाटी संगमनेर) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307, 354 अ, 341, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले करत आहेत.