भाजपा आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी अखेर जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड प्रदीप घरत, तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी अॅड. सतीश मानेशिंदे, अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला.
आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आले. ते या ठिकाणी उपचार घेत आहेत. दरम्यान आज (९ फेब्रुवारी) त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला.
३० हजार रुपयांचा सशर्त जामीन
याबाबत माहिती देताना आमदार नितेश राणे याचे वकील अॅड संग्राम देसाई म्हणाले, “नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.”
“दोन संशयित फरार आरोपींचा राणेंशी संबंध नाही”, राणेंच्या वकिलाचा दावा
“पोलिसांनी जलदगतीने तपास करत आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल अशी अपेक्षा आहे. तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळून हजर राहावे लागेल. मात्र, अन्य दोन संशयित फरार आरोपींचा राणे यांच्याशी काही संबंध नाही,” असंही संग्राम देसाई यांनी सांगितलं.
राणे यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे न्यायालयात हजर होते ते म्हणाले, जामीन मंजूर झाला आहे आता आणखी काही बोलणार नाही.” सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर करण्यात आला होता.
आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष
आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कुडाळमध्ये घोषणाबाजी करत फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगडमध्येही फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय.
भाजपा आमदार नितेश राणे यांना शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. यानंतर नितेश राणे यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत हा आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलंय. तसेच या प्रकरणी प्रशासनावर होता की नाही यावर बोलायची आज वेळ नाही. जेव्हा हे बाहेर काढायचं तेव्हा बाहेर काढू, असा सूचक इशाराही दिला. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आता आनंदाचा क्षण असल्याने यावर जास्त प्रतिक्रिया न देणे बरं होईल अशी प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे व नितेश राणे यांचे मोठे बंधू यांनी दिली तर नितेश राणे व राकेश परब दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेश नाकारला आहे. अशी माहिती नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली तर यावेळी गावागावात फटाके फुटत आहेत आणि यापुढेही फुटतील अशी खोचक प्रतिक्रिया भाजप युवा नेते आनंद शिरवळकर यांनी दिली.
“आज आनंदाचा दिवस आहे”
माजी खासदार निलेश राणे म्हणाले, “नितेश राणे यांना कोर्टाने जामीन मंजूर केला याचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टी आज बोलून उपयोग नाही. ही सर्व कोर्टाची प्रक्रिया होती. त्यात आज जामीन मिळाला. काय काय घडलं हे बोलायची वेळ आज नाही. कोर्टाने जामीन मंजूर केलाय. आज आनंदाचा दिवस आहे.”
“प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही”
“हिंदीत एक म्हण आहे ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही’ आज त्याचा नेमका अर्थ काय असतो ते कळलं आहे. प्रशासनावर दबाव होता की नाही हे बोलायची आज वेळ नाही. जेव्हा हे बाहेर काढायचं तेव्हा बाहेर काढू. आज आनंदाचा दिवस आहे एवढंच आज सांगतो, असं निलेश राणे यांनी म्हटलं.
नितेश राणे यांच्या तब्येतीविषयी विचारलं असता निलेश राणे यांनी नितेश यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे. ते लवकरच बरे होतील, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं
Web Title: Nilesh rane first reaction after nitesh rane get bail in santosh parab attack case pbs
Web Title: Bjp mla nitesh rane get bail in santosh parab attack case from court pbs