स्व.खा‌ शंकररावजी काळे साहेब-शिक्षण व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ

स्व.खा‌ शंकररावजी काळे साहेब-शिक्षण व सहकार क्षेत्रातील दीपस्तंभ


कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या छोट्याशा खेड्यात अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबात शंकरराव काळे यांचा जन्म ६ एप्रिल १९२१ रोजी झाला. वडील देवरामबाबा काळे आणि त्यांच्या पत्नी राधाबाई दोघे ही शेतीची कामे करीत. त्या सुमारास शेती हाच मुख्य व्यवसाय होता. अविरत काबाडकष्ट करत संसाराचा गाडा ओढणं हे देवरामबाबा आणि त्यांची पत्नी निष्ठेने करत. देवरामबाबांना पत्नीची म्हणजे राधाबाई काळेंची संसारात मोलाची साथ मिळाली. या माउलीने फार कष्ट उपसले. स्व. काळे साहेब आपल्या आईच्या आठवणीने नेहमीच गहिवरून जायचे. “आमच्या कुटुंबाला जी समृद्धी प्राप्त झाली त्यात माझ्या आईच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे. पण तिला बिचारीला काहीही सुख मिळालं नाही.’ या गोष्टीची साहेबांना आयुष्यभर खंत वाटत होती. देवरामबाबा फारसे शिकलेले नव्हते; पण त्यांच्या पाठी जगाचा अनुभव होता. आसपासच्या बदलत्या वातावरणाचा त्यांना अंदाज असायचा. पुढच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखलं होतं. आपल्या मुलांनी शिकावं यासाठी त्यांचा आग्रह होता.अर्थात भरपूर शिकून त्यांची इच्छा पूर्ण केली ती स्व.शंकररावजी काळे साहेबांनी. साहेब बी.एस्सी.बी.ई.(सिव्हिल) झाले. त्या काळात एवढं उच्चशिक्षण घेणारे कोपरगाव तालुक्यातले ते एकमेव व्यक्ती असावेत.


स्व. काळे साहेब माहेगाव देशमुख येथून तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोपरगावला शिकायला आले, तेव्हा त्यांचं एक वर्ष वाया जाणार होतं. ते जाऊ नये म्हणून त्यांनी इ.तिसरी आणि इ. चौथीची परीक्षा एकदमच दिली. त्या वेळी देवरामबाबांनी स्व.शंकररावांना कोपरगावच्या माळी समाजाच्या बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला. १९३४ मध्ये ते व्हर्नाक्युलर फायनल (इयत्ता ७ वी) झाले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथील उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचं वय होतं तेरा वर्ष. साहेब मॅट्रिक होईपर्यंत येथे होते. नाशिकच्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये १९३९ मध्ये मॅट्रिक पास झाले.


स्व.काळे साहेब नेहमी म्हणायचे की, मी फार हुशार विद्यार्थी नव्हतो. दरवर्षी मला कुठल्या तरी विषयात कमी गुण मिळायचे,परंतु मॅट्रिक परीक्षेत मात्र मी भरपूर अभ्यास केला आणि शेकडा ७८ गुण मिळवून पास झालो. मी हुशार नसलो, तरी अभ्यासू आणि कष्टाळू होतो. माझा हा गुण माझ्या शिक्षकांना ज्ञात होता. ते आमच्यावर फार मेहनत घेत. शाळा संपल्यावर रात्री शिकवणीला त्यांच्या घरी बोलावून घेत. संपूर्ण विद्यार्थी घडवणं ही आपली जबाबदारी आहे असं शिक्षक समजत असत.उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये असताना साहेबांच व्यक्तिमत्त्व चहु अंगाने फुलत गेलं. इथे त्यांचं खूप वाचन झालं. वाचनाची गोडी त्यांना लागली. माणसं कशी जोडावी व सांभाळावी याचं आपसूक शिक्षण त्यांना मिळत गेलं. उदोजी मराठा बोर्डिंग मधली शिस्त फार कडक होती. विद्यार्थ्यांना स्वतःची कामं स्वतः करावी लागत. जेवण वाढण्यापासून ते कपडे धुण्यापर्यंत प्रत्येकाला राबावं लागायचं. बोर्डिंगमध्ये दैनिक वर्तमान पत्र जोरात वाचून दाखवलं जायचं. जगात काय सुरू आहे याची माहिती मुलांना व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. वर्तमानपत्राचं वाचन करण्याची जबाबदारी रोज एका विद्यार्थ्यावर असायची. आवाज चांगला असल्याने बरेचदा वर्तमानपत्र वाचण्याचं काम स्व.साहेबानांच करावं लागे. यातूनच त्यांची वक्तृत्वशैली विकसित होत गेली.


मॅट्रिक झाल्यावर साहेब पुण्याला आले.पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज उत्तम आहे अशी माहिती मिळाल्यावर त्यांनी कॉलेज मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. साहेब इंटरसायन्स ला शेकडा ४८ गुण मिळवून पास झाले. पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेण्यासाठी हे गुण कमी होते,त्यामुळे पद्विकेला प्रवेश घेतला.स्व.काळे साहेब बी.एस्सी.,बी. ई.(सिव्हिल) झाले. त्यांनी मनात आणलं असतं तर त्या काळी खूप मोठ्या हुद्दयाची नोकरी त्यांना सहज मिळाली असती पण भविष्यात त्यांच्या हातून वेगळंच मोठं काम घडायचं होतं. त्यांनी दोन वर्ष नोकरी केली.१९४७ साली इंजिनिअर झाल्यावर ते एका ठेकेदाराकडे सहा महिने शंभर रुपये पगाराने नोकरीवर होते. पुण्यात त्या वेळी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) ची इमारत उभी करण्याचं काम सुरू होतं. या कामावर देखरेखीसाठी त्यांची नेमणूक झाली. पण माहेगाव देशमुखला परतण्याचा देवरामबाबांचा निर्वाणीचा निरोप आला आणि साहेब माहेगाव देशमुखच्या वस्तीवर परतले. स्व.साहेबांनी नोकरी न करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्याकडून शिक्षण,सहकार आणि सामाजिक क्षेत्रात जे भरघोस कार्य झालं ते घडलंच नसतं. एवढंच काय माहेगाव देशमुख, कोळपेवाडी ही गाव कायम उपेक्षितच राहिली असती. पण सुदैवाने तसं घडायचं नव्हत… सामाजिक कार्याची आवड, लोकांची सेवा करण्याची वृत्ती आणि नवनिर्मितीसाठी धाडसी काम अंगावर घेण्याचा स्वभाव; यामुळे स्व. साहेबांनी समाजकारणात आणि राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. इथेही त्यांनी अनेकांच्या समजुतींना धक्का देत काँग्रेस पक्षातर्फे राजकारणात न उतरता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली.वास्तविक त्या वेळी संपूर्ण भारतात काँग्रेसचं जोरदार वारं वाहत होतं. स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष म्हणून काँग्रेसला जनमानसात आदराचं स्थान होतं. अशा काँग्रेसतर्फे निवडणूक न लढवता काँग्रेसच्या तुलनेत खूपच नव्या असलेल्या शेतकरी कामगार पक्षातर्फे स्व.काळे साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढवली याचं आश्चर्य त्यावेळी अनेकांना वाटले. त्या निवडणुकीत स्व. साहेबांना पराभव पत्करावा लागला.निवडणुकीत पराभूत झाल्यावर खचून न जाता कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची कल्पना गणपतराव औताडे यांच्या मनात आली आणि ही कल्पना सत्यात उतरविण्याचे आव्हान स्व. साहेबांनी स्विकारलं.


अपयशाने खचून जाणं हा त्यांचा स्वभावच नव्हता. जी आव्हानं समोर येतील त्यांना निधड्या छातीने भिडायचं… ही वृत्ती अंगी असल्याने त्यांनी को.सा.का.च्या उभारणीसाठी सारा जीव एक केला. जीवन म्हणजे आव्हानं, प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी असते हे साहेबांना अनुभवाने समजल होतं. नवी आव्हाने अंगावर घेण्याची आवड होतीच, त्यात समाजसेवाही जोडलेली आहे हे बघितल्यावर साहेबानी ‘को.सा.का.’साठी स्वतःला अक्षरश: वाहून घेतलं. त्या वेळी महाराष्ट्रात सहकाराचं वारं वाहू लागलं होतं. आपल्याही भागात ऊसाचं चांगलं पीक आहे. त्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना संघटित करून सहकारी साखर कारखाना उभारून आपल्या उपेक्षित भागाचा विकास करू शकतो हे त्यांनी ओळखलं. स्व. ग. र. औताडे व साहेबांनी अवघ्या तीन वर्षात कारखाना उभा केला. विकासाचं रथचक्र फिरू लागलं. विरोधक, समर्थक, सहकारी या अफाट कार्याने अचंबित झाले. माहेगाव देशमुख मधल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने असामान्य कष्ट उपसत एक कारखाना उभा केला होता. १९५३ मध्ये साखर कारखान्याच्या उभारणीला सुरुवात झाली आणि १९५६ मध्ये पहिल्या गळीत हंगामात ५२,२३४ मेट्रिक टन उसाचे गाळप झालं.


स्व. काळे साहेब यांच्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या विकासाचा वारू चौफेर उधळला होता. डॉ. धनंजयराव गाडगीळ, वामनराव वर्दे, पद्मश्री स्व.विठ्ठलराव विखेपाटील, स्व.गणपतराव औताडे, या ज्येष्ठांच्या विचारांची बैठक या विकासाला लाभली. एका माळरानाचं रूपांतर नंदनवनात होऊ लागलं. स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांचे आयुष्य दोन महत्त्वाच्या टप्प्यात विभागलेलं आहे. पहिल्या टप्प्यात बालपण ते ‘कोसाका’ उभारणी हा भाग येतो. या काळात त्यांच्यातला कार्यकर्ता संघटक घडत होता. विकासाच्या नव्या-नव्या कल्पना त्यांच्या मनात येत होत्या. नवे प्रयोग ते करत होते. तर दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यातल्या संघटकाची जागा कुशल नेतृत्वाने घेतली. त्यांच्यातला उद्योजक सजग होत होता. नवप्रयोगांचे, नवनिर्मितीचे निर्णय वेगाने होत होते. कल्पनांना व्यवहाराची जोड मिळत होती आणि या सगळ्यांत शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य होतं. याच गुणांमुळे स्व. साहेबांची लोकप्रियता अहमदनगरच्या सीमा ओलांडून सर्वत्र पसरली.
१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर आदरणीय स्व.यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज्याचा स्वीकार केला. या निर्णयामुळे काँग्रेस बहुजनांच्या हितासाठी काम करणार आहे हे स्पष्ट झालं. शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या स्व. काळे साहेबांनी अभ्यासू वृत्तीने आधी सर्व पैलूंचा विचार केला आणि आदरणीय यशवंतराव चव्हाणांच्या साक्षीने काँग्रेसमधे प्रवेश केला. आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव हेही त्यातील एक महत्त्वाचं कारण होतंच. त्यामुळे स्व. काळे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीत न उतरता काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा परीषदेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ५८ जागांपैकी ३४ जागा जिंकत तिथेही आपला झेंडा रोवला. यामध्ये सर्वश्री स्वर्गीय साहेबां, खास.स्व.बाळासाहेब विखे, वसंतराव खंडागळे. आम .पी.बी.कडूपाटील, रंगनाथ पंदरकर यांचा विजयी उमेदवारांत समावेश होता. निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर काळे साहेबांची तर उपाध्यक्ष पदासाठी बाळासाहेब विखेंची बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे स्व. शंकरराव काळे साहेबांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड होण्यासाठी के. बी. रोहमारे व दादा शहाजी रोहमारे यांचंही सहकार्य लाभलं. कालांतराने साहेबांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड़ बसवली.स्व. साहेब १९६२ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी कामाचा धडाकाच लावला. संपूर्ण जिल्ह्यात सहकाराचं वारं वाहत होतंच. कार्यकर्ते, नेते, शेतकरी यांच्यात उत्साह निर्माण झाला. सहकारातून वेगवेगळ्या संस्था उभ्या राहिल्या. शेतीसोबतचं ग्रामविकासाचं दालनही खुलं झालं. १९६२ ते १९७२ अशी सलग दहा वर्षे स्व. काळे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात अनेक विकास कामं केली. त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम केलं ते शिक्षणक्षेत्रात आणि जलसंवर्धनात.तसंच शेतीसाठी बारमाही पाणी मिळावं म्हणून अनेक योजना राबवल्या. ही सगळी कामं अहमदनगर जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूतच ठरली. जिल्हा परिषदेच्या यशस्वी कामगिरीमुळे साहेब जिल्हा पातळीवरून राज्यपातळीवरील राजकारण करण्यास सज्ज झाले. पारनेर विधानसभा मतदारसंघातून सन १९७२ व १९७८ असे दोन वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. पारनेर सारख्या सतत दुष्काळी भागासाठी विकासाची कामे केली. पाझर तलाव, ग्रामीण रस्ते, दवाखाने, हायस्कूल, सहकारी संस्थांची स्थापना करून ग्रामीण भागाला संजीवनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात सन १९७८ साली शिक्षण व सहकार खात्याचे राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. त्यांनी राज्यमंत्री असतांना खाजगी व विना अनुदानित प्राथमिक शाळांना अनुदानित करून तंत्रशिक्षण व महिला-मुलींचे शिक्षणाला प्रथम प्राधान्य दिले. राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची मिळालेली संधी हे समाजसेवेचे व्रत आहे असे मानून ते कार्यरत राहिले. स्व. काळेसाहेब हे १० व्या लोकसभेसाठी कोपरगांव लोकसभा मतदारसंघातून मे १९९१ मध्ये विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांनी कोपरगाव मतदारसंघाचे सन १९९१ ते १९९६ अखेर प्रतिनिधित्व केले होते.


को.सा.का.उद्योगसमूहाला वैभवाचे दिवस दाखवण्याचं काम सुरू असताना स्व.साहेबांनी शिक्षणक्षेत्रात तर अत्यंत मोलाची कामगिरी केली. शिक्षणामुळे व्यक्तीमध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण होते, त्यामुळेच त्याचे सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक परिवर्तन होऊ शकते. पर्यायाने समाजाची सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक उंची वाढू शकते, हे सर्व परिवर्तन समाजाच्या सर्व पातळ्यांवर व्हावयाचे असेल तर, बहुजन समाजातील सर्वसामान्य गोर-गरीब माणसाला शिक्षण मिळाले पाहिजे. कारखाना कार्यस्थळावर गौतम एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना इंग्रजी त्यांच्या गावातच शिकता यावं यासाठी गौतम पब्लिक स्कूल सुरू केलं. त्याचप्रमाणे कारखाना परिसरात राधाबाई काळे कन्या विद्या मंदिराच्या उभारणीत पुढाकार घेतला. स्वतः उच्चशिक्षित असल्याने त्यांना शिकण्याचं महत्व ठाऊक तर होतंच पण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव हे सर्वात महत्त्वाचं कारण होतं. समाजाच्या तळागाळातील माणसाला शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीर अण्णांनी महाराष्ट्र पालथा घातला. त्यांच्या या कार्याला हजारो लोकांनी हातभार लावला. निस्वार्थी भावनेने काम करणारे कार्यकर्ते हेच कर्मवीर अण्णांच्या कार्याचे मुख्य शक्तिस्थल होते. अहमदनगर सारख्या अत्यंत दुर्गम, अखंड दुष्काळाने ग्रासलेल्या प्रदेशात प्रचंड मोठी बौद्धिक क्षमता लपलेली आहे. त्या क्षमतेला योग्य संधी उपलब्ध करून दिली, तर तेथील गुणवत्ता पुढे येईल. या विचाराने कर्मवीर अण्णांनी नगर जिल्ह्यात शाळा उभा करण्याचा संकल्प सोडला. या अण्णांच्या संकल्पपूर्तीला अहमदनगर जिल्ह्यातील दादा पाटील, पद्मश्री विखे पाटील यांच्या सारख्यानी अनेक मौलिक स्वरूपाचे पाठबळ दिले. त्यामुळे तेथे एक शैक्षणिक चळवळ निर्माण झाली. ही शैक्षणिक चळवळ समृद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांची जी भक्कम फळी उभी राहिली त्यामध्ये मा.शंकररावजी काळे साहेब हे एक बिनीचे शिलेदार होते.

कर्मवीर भाऊराव पाटील यांना ज्यांनी प्रत्यक्ष काम करताना बघितलं त्या सुदैवी लोकांपैकी स्व. काळे साहेब हे एक होत. कर्मवीरांसोबत साहेबांचा संपर्क १९४८ च्या सुमारास आला. शिक्षण प्रसारासाठी अहोरात्र झटणाऱ्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाने साहेब भारावले होते. कारखाना सुरू झाल्यावर एकदा कर्मवीर भाऊराव पाटील कोपरगाव साखर कारखान्यात साहेबांना भेटायला आले. साहेबांच्या आयुष्यातला तो अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. एवढंच नव्हे तर कर्मवीर साहेबांच्या माहेगाव देशमुख येथील वस्तीवर मुक्कामीही थांबले होते. अर्थात मनात काही हेतू होताच… पण ऋषीतुल्य माणसांचा हेतू हा जनतेच्या हिताचाच असतो.कर्मवीरांनी साहेबांकडे एकच मागणी केली, “मला तुम्ही खळ्यातलं मातेरं द्या आणि धान्य तुम्हाला ठेवा.” म्हणजे शिक्षणप्रसारासाठी रयत संस्थेला कारखान्यातर्फे थोडी मदत करा. कर्मवीरांचा शब्द प्रमाण मानला. त्यांनी भरघोस मदत केली. स्वतः नव्या शाळा काढल्या, इतरांना शाळा सुरू करायला मदत केली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळांचा प्रसार केला, प्रसंगी पदरमोड करून अनेक शाळा-महाविद्यालय उभी केली. हे सगळं करताना स्व. साहेबांनी कसलाही हेतू मनात ठेवला नव्हता. प्रसिद्धीची हाव नव्हती, पदाची लालसा नव्हती. कर्मवीरांनी दाखवलेल्या ज्ञान प्रकाशात त्यांनी पुढची वाटचाल केली. त्यामुळे आशियातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था म्हणून नावाजलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदावर त्यांची नेमणूक झाली. कारखान्याने कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय गौतमनगर, श्री. शिवशंकर विद्यालय रवंदे.,श्री.ग.र.औताडे मा.व उच्च मा. विद्यालय पोहेगाव,मारुतराव दगडूजी तिडके पा.मा.व उच्च मा. विद्यालय चासनळी, गुरुवर्य तुकारामबाबा विद्यालय कुंभारी, न्यू इंग्लिश स्कूल धामोरी, या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांना इमारती बांधून दिलेल्या असून नाशिक जिल्ह्यातील डी. आर. भोसले विद्यालय देवगाव व जनता विद्यालय मुखेड तसेच कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनेवाडी, सौ. सुशीलामाई शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय भोजडे, कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय करंजी व सौ. सुशीलामाई काळे माध्यमिक विद्यालय उक्कडगाव या विद्यालयांना वर्गखोल्या बांधण्यास मदतीचा हात दिला आहे. तसेच या विद्यालयांसाठी आवश्यक असणारी जमीनही त्या त्या ठिकाणी वेळोवेळी घेऊन दिलेली आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर कार्यरत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी तसेच कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेज व जिल्ह्याचे ठिकाणी अहमदनगर येथे कार्यरत असलेल्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय,जामखेड, नगर, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा यांसारख्या अनेक ठिकाणी वेळोवेळी भरीव आर्थिक मदत केलेली आहे. मा. काळे साहेबांना १९७५-९० अशी पंधरा वर्षे संस्थेचे चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मिळालेली संधी ही समाजसेवेचे व्रत म्हणून त्यांनी केलेले कार्य आजच्या पिढीला आदर्शवत् तर आहेच आहे, परंतु तेवढेच ते मार्गदर्शकही आहे..कर्मवीरांना संपूर्ण महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षणाचे जाळे निर्माण केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या रयतेच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची व्यवस्था येथेच व्हावी म्हणून छ. शिवाजी कॉलेजची स्थापना करून उच्च शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले. तोच अण्णांचा कृतिशील विचार नगर जिल्ह्यात रूजविला. नगर जिल्ह्यात रयतेची उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये असावीत ही त्यांची सुप्त इच्छा अतिशय खडतर प्रयत्नातून पूर्ण केली. एखादी शाखा उभी करण्याचा निश्चय उराशी बाळगून काम करताना त्याची परिपूर्ती केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही हा स्व.काळे साहेबांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग होता.त्यांच्या प्रयत्नातून अहमदनगर जिल्ह्यात अनेक महाविद्यालये उभी राहिली आहेत. या शाखांच्या उभारणीतून त्यांच्या कल्पक नेतृत्वाचीच छाप पडते. वाशी (नवी मुंबई) येथील मॉडर्न हायस्कूल रयतला मिळावे यासाठी स्व.शंकररावजी काळे साहेबांनी केलेले प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे आज त्याच जागेत संस्थेतील आणि नवी मुंबई परिसरात उभे राहिलेले, एक नावाजलेले कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पाहिले की, काळे साहेबांच्या दूरदृष्टीची साक्ष पटते.श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा या नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या उभारणीनंतर कोपरगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण देणारे केंद्र का असू नये? असा विचार मा. शंकररावजी काळेसाहेब यांच्या मनात येणे अगदीच स्वाभाविक होते. या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी अनेक अडचणी उभ्या राहिल्या, या सर्वच समस्यांवर मात करीत शेवटी केवळ सायन्स विभाग घेऊन महाविद्यालय सुरू केले. विशेष म्हणजे या महाविद्यालयाची परवानगी मिळावी यासाठी काळेसाहेबांनी विद्यापीठाची निवडणूक लढविली. त्या अधिकार मंडळाचे सदस्यत्व स्वीकारून आपल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाविद्यालयाची परवानगी मिळविली. जिद्दीने पैसे गोळा करून इमारत उभी केली.यासाठी मा.स्व.शंकररावजी कोल्हे,अॅड.वझे आणि इतरांनी या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी केलेल्या मदतीचा काळेसाहेब नेहमीच कृतज्ञतापूर्वक उल्लेख करायचे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. शेवटी याच महाविद्यालयात तिन्ही शाखा सुरू झाल्या. स्वामी सहजानंद भारती, संत गंगागीर महाराज हे या परिसरातील मोठे संत ज्यांनी या परिसरातील माणसांची आध्यात्मिक उंची वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच जणू कोपरगावच्या महाविद्यालयाला श्री. सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस आणि संजीवनी कॉमर्स’ असे नाव देण्यात आले.


मा. शंकररावजी काळे यांनी संपूर्ण जीवनभर कर्मवीर आण्णांच्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य केले. ते करीत असताना संस्थेच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाला प्राधान्य दिले. २१ व्या शतकातील आव्हानांना समर्थपणे तोंड देणारा विद्यार्थी तयार झाला पाहिजे. त्याला माहिती तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा यांसारख्या विविध क्षेत्रांतील अद्यावत ज्ञान मिळाले पाहिजे, हा त्यांचा नेहमी आग्रह असावयाचा.त्यासाठी शिक्षकांनी अद्यावत ज्ञान आत्मसात करून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले पाहिजे, यासाठी काळेसाहेब सातत्याने प्रयत्नशील असायचे. या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी समाजातील प्रचंड स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरे जाणारा असला पाहिजे असे त्यांचे मत होते.महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला कोणताही भूमिपुत्र, कोणत्याही कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रात ज्या ज्या शैक्षणिक चळवळी निर्माण झाल्या त्या सर्व चळवळींना बळ देण्याचे सामर्थ्य देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य काळे साहेबांनी जीवनभर केले आहे. कर्मवीर अण्णांच्या कार्यातून शैक्षणिक कार्याची दीक्षा घेऊन त्यांनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपट्याला आपल्या प्रयत्नांनी मोठे केले, वाढविले. आज संपूर्ण महाराष्ट्र त्या ज्ञानवृक्षांची फळे चाखतो आहे. आपल्या राजकीय जीवनातून, सहकाराच्या माध्यमातून मा.स्व शंकररावजी काळे साहेबांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा डोंगर उभा केला आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रत्येक ‘रयत सेवकाला’ याचा सार्थ अभिमान वाटतो. नगर जिल्ह्यातील संस्थेचा विस्तार करण्यात काळे साहेबांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कुटुंबीयांच्या वतीने दिला जाणारा ‘रयत माऊली’ पुरस्कार मा. शंकरराव काळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता.पुढे उतारवयात स्व. काळे साहेबांना कॅन्सरचे निदान झाले. औषधोपचार सुरू झाले. पण त्यांच्या ह्या महान कार्यात कधीच कोणती बाधा आली नाही. ते कुठल्याही क्षणी,कुठल्याही कार्यासाठी सदैव तयार असत. एकदा दिल्लीवरून साखर संघाच्या मिटिंगसाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तार आली. त्या वेळी साहेबांनी आदरणीय पवार साहेबांना फोन करून सांगितलं की, ‘माझी तब्येत जरी ठीक नसली तरी मी येतो’. तेव्हा पवारसाहेब साहेबांना म्हणाले, ‘या वयातही तुम्ही येतो, असं म्हणता पण आम्ही तुमच्या वयाचे होऊ तेव्हा आम्हाला अशी धडाडी शक्य होईल का?’ याची शंका वाटते. तेव्हा प्रवास तर फारच दूरची गोष्ट आहे.” पुढे काही दिवसानंतर आजाराचे गंभीर परिणाम दिसू लागल्यावर साहेबांवर शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रिया अमेरिकेत करण्यात आली. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर साहेब पुन्हा मायदेशी परतले. पुढील उपचार नाशिकमध्ये सुरू करण्यात आले. उपचारा दरम्यानही साहेबांचे समाजकार्य हे सुरूच होते. दुर्दम्य इच्छाशक्ती असलेलं आणि सतत चैतन्याने सळसळतं असं हे व्यक्तिमत्व वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत नगर जिल्ह्याला, सहकारी चळवळीला मार्गदर्शकाची भूमिका वठवत राहिलं. हे या जिल्ह्याच परमभाग्यच! परंतु जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला कधी ना कधी हे मृत्युला सामोर जाव लागतच त्याप्रमाणे ५ नोव्हेंबर २०१२ रोजी साहेब आपणा सर्वांना सोडून गेले. त्यामुळे आपण व आपला समाज पोरका झाला. आपण त्यांचे कार्य यापुढेही अविरतपणे सुरू ठेवणे ही स्व. साहेबांना खरी आदरांजली ठरेल….

संदीप दिलीप चव्हाण,
महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त
उपशिक्षक,कर्मवीर शंकररावजी काळे मा.वि.करंजी