उद्या होणार नगर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अंतिम अहवाल सादर

नगर जिल्हा कुणबी नोंदीचा अंतिम अहवाल 8 तारखेला होणार सादर
kunbi

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य शासनाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन करून शासकीय कार्यालयातील कुणबी नोंदी तपासणी मोहिम राबविली. जिल्हास्तरावर शोधलेल्या कुणबी नोंदीचा अहवाल न्यायमूर्ती शिंदे समितीला शनिवारी सादर करण्यात आला. मात्र, जिल्ह्यात अद्याप कुणबी नोंदी शिल्लक नाहीत ना याची खातर जमा करून येत्या 8 डिसेंबरला याबाबतचा अंतिम अहवाल सादर करण्याच्या सुचना न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला असून या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवासी जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील या कक्षाचे सदस्य सचिव आहेत.

या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहायक आयुक्त (नगर पालिका प्रशासन), तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिल्ह्यात युद्धपातळीवर राबवण्यात आली. या नोंदणी शोधण्यासाठी सुमारे 64 लाखांपेक्षा अधिक कागदपत्रे तपासण्यात आली. सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिलेल्या माहितीनूसार जिल्ह्यात 95 हजारांंच्या जवळपास कुणबी नोंदणी आढळ्या होत्या. त्यानंतर गोपनियतेच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाने आढळलेल्या कुणबी नोंदीचा तपशील दिलेला नाही.

जिल्ह्यात आढळलेल्या कुणबी नोंदीची माहिती काल नाशिक येथे झालेल्या विभागीय बैठकीत न्यायमुर्ती शिंदे यांच्या समितीला सादर करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील कुणबी नोंदीबाबतची अंतिम माहिती आणि अहवाल 8 डिसेंबरला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बैठकीला नगरहून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्यासह महसूलचे अधिकारी उपस्थित होते.