नदीने पुराची पातळी ओलांडली असून हिंगणी बंधारा पाण्याखाली गेला
असून कोपरगाव शहरातील लहान पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री दहा वाजता नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातुन ६९ हजार ५६३ क्युसेक वेगाने पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आल्याने ते पाणी कोपरगाव शहरापर्यंत
आल्यानंतर शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता दाट आहे. सायंकाळी ५ वाजता पाटबंधारे विभागाने ४९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला होता तेव्हा या पुलाला पाणी टेकण्यासाठी किंचीत कमी होते आता तर ६९ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे.
तसेच कोपरगाव तालुका व नदीकाठच्या परिसरातील पावसाचे पाणी नदीपात्रात वाढणार असल्याने गोदावरीचा छोटा पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता अधिक आहे.
जर घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहीला तर गोदावरीला पुर येण्याची शक्यता दाट आहे. नदीला वाढलेले पाणी आणि पावसाचा वाढता जोर लक्षात घेवुन संपूर्ण स्थानिक प्रशासन सध्या दक्ष आहे.
गोदावरीच्या पाण्यावर शासकीय यंत्रणा रात्रभर लक्ष ठेवून आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अलर्ट केली आहे.
कोणताही धोका होणार नाही याची खबरदारी ते घेत आहेत. पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार सध्या नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातुन ६९ हजार ५६२ क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार 12 जुलै रोजी सकाळी 6 वा. 72 हजार 717 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह नांदूर मधमेश्वर येथून गोदावरी नदीत सोडण्यात आला आहे.