जिल्ह्यातील पशूपालकांसाठी पाऊण कोटी


 तीन वर्षात 27 लाखांची मदत तर आणखी 40 लाखांचा निधी प्रस्तावीत

साथ रोग अथवा अन्य कारणामुळे दगावलेल्या जनावरांमूळे शेतकरी अथवा संबंधीत पशूपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. या पशूपालकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पूशसंवर्धन विभागाच्या मार्फत आर्थिक मदत देण्यात येत असून गत तीन वर्षात 500 हून अधिक पशूपालकांना 27 लाखांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. तर आणखी 40 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी दिली.
नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू असून यामुळे शेळ्या, मेंढ्यासह दुभत्या मोठ्या जनावरांची संख्या मोठी आहे. या जनावरांच्या किमंती मोठ्या असून यात पशूपालकांचे एखादे जनावर दगावले तर त्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यात अशा घटना घडत असल्याने जिल्हा परिषदेमार्फत अशा शेतकरी अथवा पशूपालकांना अल्प प्रमाणात मदत देण्याची कल्पना सभापती गडाख यांना सुचली. यासाठी त्यांनी तीन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तरतूद करून जिल्ह्यात दगावणार्‍या मोठ्या जनावराला दहा हजार तर लहान जनावरांसाठी प्रत्येकी एक हजार याप्रमाणे पाच जनावरांपर्यंत आर्थिक भरपाई देण्याची योजना सुरू केली.

त्यानूसार जिल्ह्यात जिल्हा परिषद पशूसंवर्धन विभागाने 2019-20 मध्ये 391 गायी, 17 म्हैस, 15 बैल, 151 शेळ्या, 60 मेंढ्यांच्या 287 पशूपालकांना 9 लाख 99 हजार. 2020-21 ूमध्ये 163 पशूपालकांच्या 247 गायी, 7 म्हशी, 6 बैल, 76 शेळ्या आणि 44 मेंढ्यासाठी 6 लाख 97 हजारांची मदत दिलेली आहे. तसेच 2021-2022 मध्ये 59 पशूपालकांच्या 131 गायी, 1 म्हैस, 1 बैल, 34 शेळ्यासाठी दहा लाख रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
2021-22 मध्ये नुकसान भरपाई प्राप्त प्रस्ताव आणि त्यासाठी करण्यात आलेली तरतूद ही दहा लाख असल्याने त्यात आणखी पाच लाखांची वाढ करण्यात आलेली आहे. यासह जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानूसार गारपिठ, चक्रीवादळ, साथ रोग, थंडी आणि विषबाधेमुळे मृत पावलेल्या जनावरांसाठी आणखी 40 लाखांचा निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे.
आपण सर्व शेतकर्‍यांची मुले आहेत. शेतकर्‍यांचे एक दुभते जनावर दगावल्यास त्याची मोठे आर्थिक नुकसान होते. त्याला पूर्णपणे मदत देणे शक्य नाही. मात्र, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फूलना फुलाची पाकळी म्हणून ही मदत योजना सुरू करण्यात आलेली आहे. पात्र शेतकरी आणि पशूपालकांना मदत देण्यात आहे.

- सुनील गडाख, सभापती, पशूसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद